Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Tourism : महाराष्ट्र पर्यटनाचा ‘डिजिटल’ कायापालट; AI चॅटबॉटपासून स्मार्ट पार्किंगपर्यंत पर्यटकांसाठी नवी व्यवस्था!

New digital facilities for tourists in Maharashtra : महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून पर्यटकांसाठी AI चॅटबॉट, स्मार्ट पार्किंग आणि डिजिटल सुविधांचा विस्तार; पर्यटनाचा अनुभव अधिक सोपा आणि स्मार्ट होणार.

Rashmi Mane

विकास पानसरे (भा.प्र.से.), संचालक, पर्यटन संचालनालय

जागतिक पर्यटन क्षेत्राचा सातत्याने विकास होत असताना डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे पर्यटनाच्या भविष्यातील महत्त्वाचे घटक ठरत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे पर्यटनाचा अनुभव घेण्याची आणि त्याचे व्यवस्थापन करण्याची पद्धत बदलत आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे पर्यटकांना माहिती आणि सेवा अधिक सहज उपलब्ध होत असतानाच, पर्यटनाचे नियोजन आणि व्यवस्थापन अधिक कार्यक्षमपणे करणे शक्य होत आहे. जागतिक पर्यटन दिन २०२६ची ‘डिजिटल अजेंडा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे पर्यटनाची पुनर्कल्पना’ ही संकल्पना पर्यटन क्षेत्रातील या बदलांचे महत्त्व अधोरेखित करते.

या दृष्टिकोनाशी सुसंगतपणे महाराष्ट्र पर्यटन विभाग डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करून पर्यटकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि वैयक्तिक स्वरूपाचा पर्यटन अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या दिशेने विभागामार्फत डिजिटल डॅशबोर्ड, स्मार्ट तिकिटिंग, ‘महाअतिथी’ संकेतस्थळ, मोबाईल अ‍ॅप, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘महामुनी’ चॅटबॉट, स्मार्ट पार्किंग आणि डिजिटल क्षमता-विकास कार्यक्रम अशा विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

महाराष्ट्रातील पर्यटनाबाबत एकाच व्यासपीठावर सर्वसमावेशक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी पर्यटन विभागाचे संकेतस्थळ अद्ययातवपणे कार्यान्वित आहे. याखेरीज, येत्या काळात या संकेतस्थळावर संबंधित सेवा- उपक्रमांची माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी डिजिटल डॅशबोर्ड विकसित करण्यात येणार आहे. या माहितीमुळे राज्यातील विविध पर्यटनस्थळांवरील परिस्थिती समजून घेणे आणि प्रत्यक्ष माहितीच्या आधारे निर्णय घेणे अधिक सुलभ होणार आहे.

पर्यटनाशी संबंधित माहिती एका ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे पर्यटन व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाचे अधिकृत संकेतस्थळ हे पर्यटकांना अद्ययावत आणि उपयुक्त माहिती उपलब्ध करून देणारे महत्त्वाचे डिजिटल व्यासपीठ आहे. राज्यातील विविध पर्यटनस्थळे, जिल्हे, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा, समुद्रकिनारे, निसर्गरम्य ठिकाणे, धार्मिक स्थळे, साहसी पर्यटन आणि इतर पर्यटन आकर्षणांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध पर्यटन पर्यायांची माहिती पर्यटकांना एकाच ठिकाणी मिळण्यास मदत होते.

महाराष्ट्र पर्यटन विभाग राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम आणि संघटित करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. यामध्ये ‘महाअतिथी’ संकेतस्थळ हे महत्त्वाचे डिजिटल व्यासपीठ आहे. पर्यटक आणि पर्यटन क्षेत्रातील भागधारक यांच्यातील विश्वासार्ह दुवा म्हणून हे पोर्टल कार्यरत आहे. या संकेतस्थळावर राज्यातील विविध प्रकारच्या पर्यटक निवास व्यवस्था, पर्यटन टूर, विविध अनुभवसमृद्ध पर्यटनविषयक बाबींचा समावेश आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून थेट आरक्षणाची सेवादेखील उपलब्ध आहे. यामध्ये विविध टूर्स, होमस्टे, बेड अँड ब्रेकफास्ट (B&B), हॉटेल्स, रिसॉर्ट्स, कृषी पर्यटन केंद्रे, फार्म स्टे आणि पर्यटन व्हिला यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील पर्यटनाशी संबंधित माहिती आणि सेवा एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी अधिकृत ‘Maharashtra Tourism’ मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात येणार आहे. या अ‍ॅपद्वारे पर्यटनस्थळांची माहिती, नकाशे व मार्गदर्शन, प्रवास नियोजन, हॉटेल्स व पर्यटन सेवा, तिकीट आरक्षण, कार्यक्रम, स्थानिक अनुभव, आपत्कालीन संपर्क तसेच पर्यटकांना अभिप्राय नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देता येणार आहे. या उपक्रमातून “One App – Complete Maharashtra Tourism Experience” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे उद्दिष्ट आहे.

जागतिक पर्यटन दिन २०२६च्या संकल्पनेशी सुसंगतपणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा पर्यटन क्षेत्रात प्रभावी वापर करण्यासाठी ‘महामुनी’ हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पर्यटन चॅटबोटचा पर्याय उपलब्ध आहे. या माध्यमातून पर्यटकांना जलद, वैयक्तिक आणि बहुभाषिक स्वरूपात पर्यटनविषयक माहिती उपलब्ध आहे. पर्यटक पर्यटनस्थळे, धार्मिक व आध्यात्मिक स्थळे, पर्यटन सर्किट, प्रवासाचे मार्ग, तिकिटे, निवास, कार्यक्रम, स्थानिक अनुभव आणि इतर प्रवासाशी संबंधित आवश्यकतांबाबत माहिती मिळवू शकतील. पर्यटकांची आवड, उपलब्ध वेळ, अंदाजित खर्च आणि प्रवासाचा उद्देश लक्षात घेऊन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून वैयक्तिक प्रवासाचे नियोजन करणे सोपे होणार आहे.

पर्यटन क्षेत्रातील मनुष्यबळ, स्थानिक उद्योजक, पर्यटन व्यावसायिक आणि सेवा पुरवठादारांना डिजिटल युगातील आवश्यक कौशल्ये उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल क्षमता-विकास कार्यक्रम आगामी काळात राबविण्यात येणार आहे. यामध्ये डिजिटल विपणन, समाजमाध्यम व्यवस्थापन, ऑनलाइन बुकिंग प्रणाली, डिजिटल भरणा, पर्यटकांशी संवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता, आशय निर्मिती, सायबर सुरक्षा आणि माहिती-आधारित पर्यटन व्यवस्थापन अशा विषयांचा समावेश करता येणार आहे. “Empowering Local Communities through Digital Tourism” या दृष्टिकोनातून हा उपक्रम स्थानिक रोजगार आणि उद्योजकतेलाही पाठबळ देऊ शकतो.

पर्यटनस्थळांवरील पर्यटकांची सुरक्षितता आणि गर्दीचे व्यवस्थापन हे विशेषतः मोठ्या प्रमाणावर पर्यटक येणाऱ्या ठिकाणी महत्त्वाचे आहे. यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागामार्फत प्रमुख पर्यटनस्थळांवर CCTV प्रणाली आणि स्मार्ट प्रवेशद्वार विकसित करण्याचे विचाराधीन आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पर्यटकांची सुरक्षितता, गर्दीची स्थिती आणि संभाव्य आपत्कालीन परिस्थितींवर लक्ष ठेवता येणार आहे. स्मार्ट प्रवेशद्वारांमधून क्यूआर कोड किंवा डिजिटल तिकिटांच्या आधारे जलद आणि संपर्करहित प्रवेशाची सुविधा उपलब्ध करून देता येईल. ही सुविधा मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची वर्दळ असलेल्या धार्मिक स्थळे, किल्ले, संग्रहालये आणि प्रमुख पर्यटन प्रकल्पांवर टप्प्याटप्प्याने राबविता येणार आहे.

कोल्हापूर येथे वर्षभर मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येतात, नवरात्रोत्सवासारख्या सणांच्या काळात ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा काळात पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनाचे आव्हान निर्माण होते. या पार्श्वभूमीवर पर्यटन विभागाने कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर परिसरात स्मार्ट पार्किंग व्यवस्था कार्यान्वित केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना मोबाईल अ‍ॅपद्वारे पार्किंगची उपलब्धता तपासून योग्य पार्किंगची जागा शोधता येते. अ‍ॅपद्वारे किंवा निश्चित क्यूआर कोड स्कॅन करून पार्किंगची जागा आगाऊ आरक्षित करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. पार्किंगच्या उपलब्ध जागांची माहिती प्रत्यक्ष वेळेनुसार अद्ययावत होत असल्यामुळे परिसरात पोहोचण्यापूर्वी पार्किंगची स्थिती तपासता येते.

पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध परवानग्या, नोंदणी आणि प्रमाणपत्रे अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी पर्यटन विभागाच्या १० सेवा MAITRI 2.0 पोर्टलवर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये पर्यटन धोरणांतर्गत पर्यटन घटकांना वर्गीकरण प्रमाणपत्र देणे, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) पर्यटन प्रकल्पांना पात्रता प्रमाणपत्र देणे, मेगा व अल्ट्रा मेगा पर्यटन प्रकल्पांना मान्यता देणे, मुद्रांक शुल्क सवलत देणे तसेच कृषी पर्यटन, साहसी पर्यटन आणि कॅराव्हॅन पर्यटनाची नोंदणी यांसारख्या सेवांचा समावेश आहे. याशिवाय व्हिला, अपार्टमेंट, होमस्टे आणि बेड अँड ब्रेकफास्ट उपक्रमांच्या नोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला https://maharashtratourism.gov.in भेट देता येईल.

जागतिक पर्यटन दिन २०२६च्या निमित्ताने महाराष्ट्र आपल्या समृद्ध वारसा, संस्कृती, निसर्ग, अध्यात्म, साहस आणि स्थानिक अनुभवांना डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आधुनिक पर्यटन व्यवस्थेशी जोडत आहे. तंत्रज्ञान आणि मानवी सहभाग यांच्या संयुक्त बळातून अधिक सुलभ, सुरक्षित, सर्वसमावेशक आणि समृद्ध पर्यटन अनुभवाच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT