

कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने आता आपला मोर्चा थेट निवडणूक आयोगाकडे वळवला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत CJP ने त्यांना 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता. राजीनामा न दिल्यास देशभर आंदोलन आणि दिल्लीतील ‘Jantar Mantar 2.0’ आंदोलन करण्याचा इशारा CJPचे राष्ट्रीय संयोजक अभिजीत दिपके यांनी दिला.
CJPने गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेत ‘Election Commission Thik Karo’ या देशव्यापी मोहिमेची घोषणा केली. विशेष तीव्र पुनरिक्षण म्हणजेच SIR प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतील 13 कोटींपेक्षा अधिक नावे वगळल्याचा दावा करत संघटनेने निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, ही CJPची मांडणी असून निवडणूक आयोगाने वेगळे स्पष्टीकरण दिले आहे.
या आंदोलनामागे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी 10 महिन्यांत किमान 14 वेळा SIRशी संबंधित निर्णय आणि प्रक्रियांवर आक्षेप नोंदवले होते. या आक्षेपांमध्ये मतदार नोंदणी, नाव वगळणे, Form 6 मधील बदल आणि मतदार यादीच्या डेटाच्या केंद्रीकरणाशी संबंधित मुद्द्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे.
निवडणूक आयोगाने मात्र या नोंदींना संस्थेतील नियमित निर्णयप्रक्रियेचा भाग असल्याचे म्हटले आहे. आयोगाच्या मते, सदस्यांकडून मांडले जाणारे वेगवेगळे मत, सूचना आणि अंतर्गत तपासणी ही निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतील सामान्य बाब आहे.
CJPने SIR प्रक्रियेतील निर्णयांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच जानेवारी 2025 मधील मतदार यादी पुनर्स्थापित करून पुढील वगळण्याची प्रक्रिया थांबवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित 2023 च्या कायद्यात बदल करण्याची मागणी CJPने केली आहे.
पहिल्यांदा NEET परीक्षेतील कथित पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर आंदोलन केल्यानंतर CJPने आता ‘Election Commission Thik Karo’ मोहिमेद्वारे मतदार यादी आणि निवडणूक प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आगामी काळात CJPचा आंदोलनाचा विस्तार किती होतो आणि निवडणूक आयोग या मागण्यांवर काय भूमिका घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.