CM Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Fadnavis Government : हिंदीविरोधाकडे दुर्लक्ष, सरकार 'तिसरी' भाषा रेटणार? शिक्षकांच्या नेमणुकीची तयारी सुरु

Trilingual Language Policy in Maharashtra : राज्यभरात त्रिभाषा सुत्राला आणि हिंदी भाषा शिकविण्याला कडाडून विरोध होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक साहित्यिक, कलाकार, उद्योजक, मराठी भाषेचे अभ्यासक आणि सर्वसामान्य लोक या निर्णयाचा कडाडून विरोध करत आहेत.

Hrishikesh Nalagune

Hindi Language oppos : राज्यभरात त्रिभाषा सुत्राला आणि हिंदी भाषा शिकविण्याला कडाडून विरोध होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक साहित्यिक, कलाकार, उद्योजक, मराठी भाषेचे अभ्यासक आणि सर्वसामान्य लोक या निर्णयाचा कडाडून विरोध करत आहेत. पण या विरोधाकडे दुर्लक्ष करत सरकारने हा निर्णय कायम ठेवण्याचे ठरवले असल्याचे दिसून येते. सरकारकडून आता तिसऱ्या भाषेसाठी शिक्षक नेमण्याची तयारी सुरु झाली आहे.

राज्यात सध्याच्या स्थितीत हिंदीशिवाय अन्य तिसऱ्या भाषेचे शिक्षकच उपलब्ध नाहीत. त्यामुळे आधी सरल पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांकडून तिसऱ्या भाषेचे पसंतीक्रम घेतले जातील. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाकडून त्या त्या भाषेचे शिक्षक कंत्राटी तत्त्वावर भरले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी निवडलेल्या भाषांनुसार अंदाजे आठ ते दहा हजार शिक्षक भरावे लागतील, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

विद्यार्थ्यानी निवडलेल्या विषयासाठी त्या भाषेचे तज्ज्ञ शिक्षकच नेमावे लागणार आहेत. नवीन धोरण स्वीकारल्याने त्यावर कायमचा मार्ग काढावा लागणार आहे. या सगळ्याच्या अभ्यासासाठी प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ. राहुल रेखावार यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

गोसावी आणि रेखावार मंगळवारी (24 जून) शिक्षण आयुक्तांना त्यांचा अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर तिसरी भाषा निवडण्याची कार्यपद्धती, तिसऱ्या भाषेची विद्यार्थ्यांकडून पसंती घेणे, पुस्तकांची उपलब्धता आणि कंत्राटी शिक्षक भरती, यावरील कार्यवाही ऑगस्टअखेर पूर्ण होईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या भाषेचे शिक्षक उपलब्ध आहेत का, हे पाहून कंत्राटी शिक्षक भरतीसंदर्भातील निर्णय होणार असल्याचे सांगितले जाते.

याशिवाय राज्यातील बहुतेक शाळांमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली गेली, पण तिसऱ्या भाषेची पुस्तके त्यांना अजूनही मिळालेली नाहीत. अद्याप त्या विद्यार्थ्यांची पसंती देखील जाणून घेतलेली नाही. आता इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची तिसऱ्या भाषेची पसंती घेऊन त्यांना ती पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यासाठी ऑगस्ट उजाडेल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT