Mumbai News: राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत मोडणाऱ्या 125 पंचायत समिती निवडणुकीच्या निकालात भाजपने पुन्हा एकदा सर्वाधिक जागा जिंकून या निवडणुकीत सुद्धा वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली.
बारा जिल्हा परिषदेपैकी 7 जिल्हा परिषदांवर भाजपने यश मिळवले,तर शिवसेना (शिंदे गट) पक्षाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) पक्षाने प्रत्येकी २ जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकल्या.पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत महापालिका निवडणुकीतील पराभवाची परतफेड केली आहे. काँग्रेसने सांगली, कोल्हापूर, लातूरमध्ये चांगल्या जागा मिळवल्या नंतरही बहुमतापासून दूर राहिल्याने काँग्रेसच्या वाट्याला एकही जिल्हा परिषद आलेली नाही.
राज्यातील १२ जिल्हा परिषदेमधील ७३१ जागांचे तर १२५ पंचायत समितीमधील १४६२ जागांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. यात भाजपने ७ जिल्हा परिषदेमध्ये तर ५२ पंचायत समितीमध्ये सर्वाधिक जागा जिंकत सत्ता स्थापण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.
शिवसेना शिंदे पक्षाने रत्नागिरी आणि रायगड जिल्हा परिषदेत यश मिळवत २६ पंचायत समितीमध्ये ही सत्ता मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने पुणे जिल्ह्यात एक हाती सत्ता मिळवली,तर कोल्हापुरातही दमदार वाटचाल केलीआहे. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटांनी सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट सत्तेत सहभागी होऊ शकतात.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने २५ पंचायत समितीमध्ये सर्वाधिक जागा मिळवत सत्तेच्या दिशेने वाटचाल केली आहे. राष्ट्रवादी (शरद चंद्र पवार गट) पक्षाला सांगली वगळता राज्यातील इतर ठिकाणी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. सांगलीमध्ये ६१ पैकी १९ जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने जिंकल्या आहेत तर काँग्रेसने ११ जागा जिंकले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने येथे ४ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे हे तीन पक्ष एकत्र येऊन भाजप शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवू शकतात.
१२ जिल्हा परिषदांमधील निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा फटका बसला. २०१७ साली रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्हा परिषदेमध्ये एकत्रित शिवसेनेची सत्ता होती. आता मात्र शिवसेना शिंदे पक्षाने या दोन्ही जिल्ह्याचे जिल्हा परिषदेवर आपला भगवा फडकवला आहे. आता ठाकरे गटाची एकाही जिल्हा परिषदेत सत्ता येऊ शकलेली नाही. तर १२५ पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षांची केवळ ५ तालुक्यात सत्ता येणार आहे. शिवसेना ठाकरे पक्ष प्रमाणेच राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) पक्षाची पंचायत समिती निवडणुकीत वाताहत झाली आहे. शरद पवारांच्या पक्षाची केवळ ८ तालुक्यातील पंचायत समितीमध्ये सत्ता येणार आहे.
नगरपालिका व महानगरपालिकेत बऱ्यापैकी यश संपादन करणाऱ्या काँग्रेसला जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकीत मात्र मोठा फटका बसला आहे. महानगरपालिकेत लातूर आणि कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मोठा पक्ष ठरलेला काँग्रेस पक्ष जिल्हा परिषदेत मात्र या दोन्ही जिल्ह्यात फारशी दमदार कामगिरी करता आली नाही. लातूरमध्ये काँग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष ठरला मात्र भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या युतीमुळे तो सत्तेपर्यंत पोचण्याची शक्यता कमी आहे. सांगली, कोल्हापूर जिल्हा परिषदेत काँग्रेस पक्ष सत्तेत आला तरी मोठ्या भावाची भूमिका मिळणार नाही.
राज्यातील १२ जिल्हा परिषदेपैकी ७ ठिकाणी भारतीय जनता पार्टी सत्ता स्थापन करेल. सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, लातूर, परभणी, छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव या ७ ठिकाणी भाजप स्वबळावर किंवा मित्र पक्षांबरोबर सत्ता स्थापन करेल. रायगड आणि रत्नागिरी मध्ये शिवसेना शिंदे पक्ष अनुक्रमे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत फक्त स्थापन करू शकतो. रायगड मध्ये शिवसेना शिंदे आणि तटकरे यांच्यातील वाद पाहता राष्ट्रवादीला सोबत घेतील का हा प्रश्न आहे. सांगली आणि कोल्हापूर मध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्ष शरद चंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस यांच्यात आघाडी होण्याची शक्यता आहे.
भाजप : सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, लातूर, धाराशिव, परभणी ,छत्रपती संभाजीनगर.
शिवसेना : रायगड, रत्नागिरी.
राष्ट्रवादी अजित पवार पक्ष : पुणे, कोल्हापूर.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष : सांगली.
भाजप : ५२
शिवसेना (शिंदे) : २६
राष्ट्रवादी (अजित पवार) : २५
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) : ८
काँग्रेस : ८
शिवसेना (ठाकरे) : ५
इतर : १
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.