Mahayuti Politics  Sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti News : महायुतीच्या बैठकीत 173 जागांवर एकमत; जागावाटपाची 10 सप्टेंबरला होणार घोषणा; भाजपच्या बड्या नेत्याचे विधान

Sachin Waghmare

Nagpur News : राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे जागावाटपात आता महायुतीने आघाडी घेतली आहे. लोकसभेवेळी जागावाटप करण्यास महायुतीला विलंब झाला होता. त्याचा फटका बसला होता. त्यामुळे आता जागावाटप निश्चित करण्याची लगबग सुरु झाली आहे. शुक्रवारनंतर नागपूरमध्ये शनिवारी रात्री उशिरा महायुतीची बैठक झाली. त्यामध्ये जागावाटप जवळपास अंतिम टप्प्यात आले असून येत्या 10 सप्टेंबरपर्यंत घोषणा करण्यात येणार असल्याचे भाष्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता. या फटक्यानंतर राज्यात होणाऱ्या विधानसभेसाठी तयारी जोरात सुरु आहे. आता जागावाटप लवकर मार्गी लावायचे असे महायुतीने ठरवल्याचे दिसत आहे. येत्या 10 दिवसांत महायुतीचे जागावाटप पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे भाजप (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. (Mahayuti News)

नागपुरात शनिवारी रात्री उशिरापर्यंत महायुतीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. त्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते.

या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. दरम्यान या बैठकीत भाजपला जास्त जागा देण्याबाबत चर्चा झाली असल्याचे समजते. मात्र कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावर अजून फायनल निर्णय झालेला नाही.

जागावाटप निश्चित करण्यासाठी चर्चेच्या आणखी दोन ते तीन बैठकीच्या फेऱ्या होऊ शकतात. हे जागावाटप करताना महायुतीच्या इतर मित्रपक्षांचा देखील विचार करण्यात येणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. जागावाटप कोणता पक्ष कोणती जागा जिंकण्याची क्षमता राखतो, त्यानुसार केले जाणार आहे.

महायुतीच्या बैठकीत 288 पैकी जवळपास 173 जागांवर एकमत झाले आहे. तर उर्वरित 115 जागांवर अद्याप निर्णय होणे बाकी आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यंदा देखील विधानसभा निवडणुकीत भाजप मोठा भाऊ असणार आहे. सर्वात जास्त जागा हा भाजप लढविण्याची शक्यता आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजप 140 ते 150, शिवसेना 70 ते 80 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 60 ते 70 जागा लढवतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, शुक्रवारी महायुतीची पहिली बैठक झाली. त्यामध्ये जागावाटप जवळपास अंतिम टप्प्यात आले असले तरी भाजपने 288 पैकी 150 जागा मागितल्या असल्याने चर्चा रखडली होती. शनिवारी पुन्हा चर्चा झाली. त्यामध्ये तीन पक्षाने जागांवर दावा केला.

दरम्यान, महायुतीमधील तीन पक्षाने जागेच्या हट्टापेक्षा जी जागा जो पक्ष जिंकून येऊ शकतो, त्यांनी लढावी अशी भूमिका आमची आहे. हट्टाने जागा घेणे व पुढे ती जागा पराभूत होणार नाही, यासाठी तिन्ही पक्ष पारदर्शकतेच्या चर्चा करून तोडगा काढत असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT