Mumbai News : राज्यातील वातावरण आरोप-प्रत्यारोपामुळे गेल्या चार दिवसांपासून चांगलेच तापले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्या तरी महायुतीमधील घटक पक्षात काहीच आलबेल नसल्याचे दिसत आहे.
शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे नेते आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिव्हारी लागणारे वक्तव्य केले. त्यानंतर अजित पवार गटातील नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. मात्र, कुठल्याच ज्येष्ठ नेत्यांनी या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले नाही. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाने सवाल उपस्थित करीत छेडले आहे. (Mahayuti News)
आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी कॅबिनेटला अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागते व बाहेर आल्यानंतर उलट्या होतात, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी त्यांना फैलावर घेतले. मात्र, शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी प्रतिक्रिया देत, “अजित पवार गटावर कसला दबाव आहे का? ते अपमान का सहन करत आहेत?” असा प्रश्न विचारला आहे.
या सर्व प्रकारामुळे महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. तानाजी सावंत यांनी केलेल्या बेजबाबदार वक्त्यव्यानंतरही त्यांच्यावर जोरात टीका टिपण्णी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या नेते मंडळीकडून करण्यात आलेली नाही. एकीकडे अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असे होर्डिंग लागत असताना दुसऱ्या बाजूने कधी भाजपकडून कधी आरएसएस कधी शिंदे गटाकडून, त्यांचा अपमान होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का ? असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.
दुसरीकडे तानाजी सावंत यांनी केलेल्या टीकेनंतर अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी, उमेश पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर आता नव्याने भाजप प्रवक्ते असलेले गणेश हाके यांनी अजित पवार यांच्यावर तोंडसुख घेतले. त्यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी सावंत व हाके यांच्यावर टीका केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र सध्या समोर येत आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपतील काही नेते अजित पवारांवर तोंडसुख घेत आहेत, त्यामुळे अजित पवार महायुतीला जड झालेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.