Mangesh Chivate meets Sharad Pawar  sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics : पुणे शिक्षकसाठी एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराची तगडी फिल्डिंग; थेट शरद पवारांचीच भेट!

Mangesh Chivate Sharad Pawar : मंगेश चिवटे यांनी नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीविषयी चिवटे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून सविस्तर माहिती दिली आहे.

Roshan More

Mangesh Chivate News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी दिवाळी पाडव्याला ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. शिंदेंचा शिलेदार पवारांच्या भेटीला गेल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, चिवटे यांनी फेसबूकवर सविस्तर पोस्ट करत दिवाळी पाडव्या निमित्त सदिच्छा भेट घेऊन शरद पवारांचे आशीर्वाद घेतल्याचे सांगितले. तसेच या भेटीतील चर्चेची सविस्तर माहिती देखील दिली आहे. दरम्यान, मंगेश चिवटे पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे तगडी फिल्डिंग लावण्यासाठी त्यांनी पवारांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

चिवटे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमधून सांगितले की, 'पुढील वर्षी होणाऱ्या पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातुन मी तयारी करत असल्याचे पवारसाहेबांना सांगितले. यावेळी त्यांनी या विषयावर प्रथम "थोडक्यात" आणि नंतर "सविस्तर" माहिती जाणून घेतली. शिक्षक असो की पदवीधर या दोन्ही निवडणुकांमध्ये मतदार नोंदणी हा महत्वाचा भाग आहे त्यावर लक्ष द्या असा सल्ला दिला.'

'पवारसाहेब यांना तीन पुस्तके भेट दिली आणि प्रत्येक पुस्तकावर त्यांच्यासोबत पाच मिनिटे चर्चा केली. विशेष म्हणजे भेट दिलेल्या तीन पुस्तकांपैकी दोन पुस्तके पवारसाहेब यांनी अगोदरच वाचलेली होती. ऑटोमिक हॅबिट्स आणि शाहूंच्या आठवणी या पुस्तकांमध्ये नेमके काय आहे याचा संदर्भ देखील त्यांनी चर्चेदरम्यान दिला.', असे देखील चिवटे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमधून सांगितले आहे.

पवारसाहेब यांच्या अविस्मरणीय भेटीत दररोज राजकीय, सामाजिक किंवा इतर कोणत्याही चांगल्या विषयांवरील पुस्तकांची किमान चार पाने वाचल्याशिवाय दिवसाची सुरुवात किंवा शेवट करायचा नाही हा संकल्प केल्याचे चिवटे यांनी सांगितले.

मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा

पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या मतदार यादी नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत भारत निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणीसाठी ऑफलाईन सुविधेसोबतच ऑनलाईन मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विभागातील जास्तीत जास्त पात्र मतदारांनी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर ६ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT