Manikrao Kokate News : पावसाळी अधिवेशनादरम्यान, सभागृहात रमी खेळण्याच्या आरोपांमुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सध्या प्रचंड वादात सापडले आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी मोठा दबाव टाकला जात आहे. या सगळ्या आरोप, टीका आणि दबावाला कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. "मी रमी गेम खेळत नव्हतो, तो गेम मला खेळताच येत नाही. मी फक्त जाहीरात स्कीप करत होतो त्यावेळचा व्हिडीओ असल्याचं कोकाटे यांनी स्पष्ट केलं आहे. राजीनामा द्यायला मी असं केलं तरी काय आहे, मी काय कुणाचा विनयभंग केला का?" असा संतप्त सवाल त्यांनी विचारला.
एका बाजूला या गोष्टी सुरु असताना दुसऱ्या बाजूला कोकाटे यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कृषी समृद्धी योजनेची कार्यप्रणाली जाहीर केली आहे. राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवणे हे या योजनेचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट आहे. काही दिवसांपूर्वी विधान परिषदेमध्ये कोकाटे यांनी या योजनेची घोषणा केली होती. ही योजना डीबीडी प्रणालीने राबविण्यात येणार असून मागणी आधारित राबविली जाणार आहे. याबाबतचा शासन आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर मंजुरी दिली जाणार आहे.
एकाच जिल्ह्यात जास्त निधी खर्च होणार नाही याची दक्षता घेतली असून, जिल्हानिहाय विविध घटकांवर निधीची मर्यादा निश्चित केली जाणार आहे, असे कोकाटे यांनी सांगितले. कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, पीक विविधीकरण करणे, मूल्य साखळी बळकट करणे तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन उत्पन्न वाढ करण्यासाठी राज्य सरकारने कृषी समृद्धी योजना जाहीर केली आहे. प्रति वर्षी 5 हजार कोटी अशी पाच वर्षांसाठी 25 हजार कोटी रुपयांची ही योजना आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजनेचे संचालक परिमल सिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने अहवाल सादर केला असून, त्या अहवालानुसार पोकराच्या धर्तीवर कृषी समृद्धी योजना जाहीर करण्यात आली आहे. सूक्ष्म सिंचन, हवामान अनुकूल बियाणे, पिकांचे वैविध्य, जमिनीची सुपिकता व्यवस्थापन, कमी खर्चिक यांत्रिकीकरण व मजबूत मूल्यसाखळी तयार करण्यासाठी या योजनेतून काम केले जाणे अपेक्षित आहे.
कृषी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन, एकात्मिक फलोत्पादन अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया योजना या योजनांसाठी 44 हजार 637 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या योजनासाठी डीबीडी पोर्टलवर 48 लाख 9 हजार अर्ज दाखल झाले आहेत. हरितगृह, शेडनेटगृह, मल्चिंग पेपर, क्रॉप कव्हर, पॅकहाऊस, शीतगृह, रेफर व्हॅन, कांदाचाळ, फलोत्पादन यांत्रिकीकरण, फळबाग लागवड, सूक्ष्म सिंचन, कृषी व अन्नप्रक्रिया यांकरिता मोठी मागणी आहे. मात्र यासाठी पुरेसा निधी दरवर्षी मिळत नसल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे. त्यामुळे या बाबींकरिता कृषी समृद्धी योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी शिफारसही समितीने केली होती.
या योजनेअंतर्गत वैयक्तिक तसेच सामूहिक गुंतवणुकीच्या घटकांवर आधारित कार्यन्वित असलेल्या प्रचलित योजनांसाठी 80 टक्के म्हणजे 4 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील स्थानिक गरजा लक्षात घेऊन गरजेनुसार तयार करण्यात येणाऱ्या योजनांसाठी आणि राज्यातील कृषी विकासासाठी आवश्यक संशोधन व इतर महत्त्वपूर्ण गुंतवणुकीच्या दृष्टीने प्रकल्प आधारित राज्यस्तरीय योजनांसाठी प्रत्येक 10 टक्के म्हणजे प्रत्येकी 500 कोटी रुपये देण्यात येणार आहे. 1 कोटींपर्यंतच्या प्रस्तावांना जिल्हापातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती मंजुरी देईल. ग्राम कृषी विकास समिती प्रस्तावांची तपासणी करणार आहे. राज्यस्तरीय समिती कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती या योजनेचे सनियंत्रण आणि मूल्यमापन करणार आहे.
या योजनेत मोठी गुंतवणूक केली जाणार असून याचे दरवर्षी थर्ड पार्टी ऑडिट केले जाणार आहे. सनियंत्रण मूल्यमापन संस्था नेमण्यात येईल. ही संस्था दरवर्षी संशोधन आणि डेटा संकलनावर भर ठेवणार आहे. पीक उत्पादकता, पिकांची घनता, विविध निर्देशांकामध्ये सुधारणा, सामाजिक व पर्यावरणीय संदर्भ आदींवर भर दिला जाणार आहे.
पाणी व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचनातील शेततळे, सूक्ष्म सिंचन प्रणाली आणि जलसंधारण संरचनांमध्ये गुंतवणूक
मृदा परीक्षण, सेंद्रिय खतांना प्रोत्साहन आणि अचूक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापन
कडधान्ये, भरडधान्य, तेलबिया, फलोत्पादन आणि औषधी वनस्पती अशा बहुपीक पद्धतीचा अवलंब करणे
साठवण सुविधा, कोल्ड चेन, शेतीमाल सुकविण्याची जागा, लघू प्रक्रिया युनिट्स, पॅकहाउसमध्ये गुंतवणूक आणि बाजारपेठ जोडणी
शेळीपालन, गोड्यापाण्यातील मत्स्यपालन, रेशीम उद्योग, फळबाग लागवड
शेतकरी उत्पादक संस्था, ग्राम कृषी विकास समित्यांचे बळकटीकरण, क्षमता बांधणीसाठी वनामती, रामेती, विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्र येथे प्रशिक्षण
याव्यतिरिक्त नैसर्गिक शेती, देशी गाय संवर्धनाला प्रोत्साहन आणि साह्य देण्यासारख्या बाबींचा समावेश असेल
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.