Devendra Fadnavis, Manoj Jarange, Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : "शिंदे, फडणवीसांनी माझ्याविरोधात माणसे पेरली" : मनोज जरांगेचे गंभीर आरोप, 500 कोटींच्या वादाची माळ फुटायची थांबेना

Manoj Jarange Patil News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब फोडून राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सरकारनामा ब्युरो

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकांकडून आपल्याविरोधात कट रचला जात आहे. या लोकांनी माझ्याविरोधात माणसं पेरली आहेत. आता त्यांनी नवीन डाव टाकले आहेत. माझ्यावर आरोप करा, पैसे घेतल्याचं म्हणा, पद मागितल्याचं सांगा, असं त्यांना सांगितलं जात आहे", असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला.

साम टीव्हीचे संपादक निलेश खरे यांनी घेतलेल्या ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट’ या मुलाखतीत जरांगे पाटील बोलत होते. याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. यापूर्वी त्यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराशी संबंधित ऑडिओ क्लिपचा मुद्दा उपस्थित करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

‘माझ्याविरोधात माणसं पेरली’; जरांगेंचा आरोप

जरांगे पाटील म्हणाले, “या लोकांनी माझ्याविरोधात माणसं पेरली आहेत. आता त्यांनी नवीन डाव टाकले आहेत. यात शिंदेंची आणि भाजपची माणसं आहेत. माझ्यावर आरोप करा, पैसे घेतल्याचं म्हणा, पद मागितल्याचं सांगा, असं त्यांना सांगितलं जात आहे. माझ्यावर आरोप करा, तुमचं काही होणार नाही. उलट तुम्ही ज्याच्यावर आरोप कराल, त्याच्यावर केस होईल, असं त्यांना सांगितलं जात आहे.”

आपल्याला चिथावणी देण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. “तो जिथे असेल तिथे जायचं, त्याला चीड येईल असं बोलायचं, त्याच्या गावाकडे जायचं. तो बीडमध्ये असेल, तर मुद्दाम गर्दीत जायचं,” अशा प्रकारचं नियोजन केलं जात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला.

‘५०० कोटी घेतल्याचा आरोप करून मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न’

आपण ५०० कोटी रुपये घेतल्याचा आरोप करून मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा जरांगे यांनी केला. “आम्ही गरीब माणसं आहोत. मात्र, ५०० कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप केला जात आहे,” असं ते म्हणाले.

मराठा समाजासाठी आपण प्रामाणिकपणे काम करत असल्यामुळे काही राजकीय व्यक्तींना अडचण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या मुद्द्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजासाठीही गॅझेट मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

“भविष्यात मराठा समाज माझं ऐकेल, अशी भीती राजकारण्यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांना हे सहन होत नाही. गेल्या तीन वर्षांपासून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप जरांगे यांनी केला.

ऑडिओ क्लिपची चौकशी करा; फडणवीसांना जबाबदार धरण्याचा इशारा

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची चौकशी करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं. काही राजकीय व्यक्तींकडून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही षड्‍यंत्र रचलं जात असल्याचा दावा त्यांनी केला.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून ऑडिओ क्लिपमागील सत्य समोर आणावं, अशी मागणी जरांगे यांनी केली. ऑडिओ क्लिपची चौकशी झाली नाही, तर त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरू, असा इशाराही त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT