मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. आज सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असून, मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 29 ऑगस्टपासून आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाची तयारी सुरू असून, पुढील टप्प्यात मुंबईत आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
जरांगेनी दिलेल्या इशारानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराजे देसाई आणि आमदार प्रसाद लाड हे या चर्चेत सहभागी होणार असल्याची माहिती आहे. उद्योगमंत्री उदय सामंत सकाळी साडेअकराच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ते थेट अंतरवाली सराटीकडे रवाना होऊन दुपारी 1 वाजताच्या सुमारास जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
"मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही तर मुंबईत आंदोलन करू," अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे सरकारच्या शिष्टमंडळाची आजची भेट महत्त्वाची मानली जात आहे. या चर्चेतून काही तोडगा निघतो का, याकडे मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदानाची पाहणी करण्यात आली आहे. मागील आंदोलनावेळी पावसामुळे निर्माण झालेला चिखल, व्यासपीठासाठीची जागा आणि माध्यम प्रतिनिधींसाठी असलेल्या सुविधांचा प्रश्न लक्षात घेऊन यावेळी प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे. आंदोलकांच्या येण्या-जाण्याच्या मार्गांचीही पाहणी करण्यात आली आहे.
दुसरीकडे अंतरवाली सराटीतही आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. गोदाकाठच्या 123 गावांतील समाजबांधवांच्या बैठका घेऊन नियोजन केले जात आहे. आंदोलकांसाठी अन्न, पाणी आणि वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यावर भर दिला जात आहे. "प्रत्येक घरातून एक स्वयंसेवक सहभागी व्हावा आणि आंदोलनस्थळी सकाळ-संध्याकाळ भाकरी पाठवाव्यात," अशा सूचना जरांगे पाटील यांनी दिल्या आहेत.
त्यामुळे एकीकडे सरकारकडून चर्चा आणि मनधरणीचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची तयारीही वेगाने सुरू आहे. आजच्या बैठकीत सरकार कोणता प्रस्ताव ठेवणार आणि जरांगे पाटील त्यावर काय भूमिका घेणार, यावर पुढील राजकीय चित्र अवलंबून राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.