दिनकर गुल्हाने
Pusad: मराठा आरक्षणावरून अजित पवार गटातील नेते, माजी मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यातील विस्तव जाण्याचे नाव घेत नाही. भुजबळांवर जरांगेंनी पुन्हा तोफ डागली आहे. "येवल्याच्या येडपटाला पाडू, त्यांना हिसका दाखवायला वेळ लागणार नाही, उंबऱ्याच्या बाहेर पडू देणार नाही," असा थेट हल्ला जरांगेंनी भुजबळांवर केला.
जरांगेंनी आपल्या भाषणाची सुरुवातच भुजबळांवर कडवट शब्दांत टीका करीत केली. "मराठा व ओबीसी बांधवांमध्ये वाद लावण्याचा त्यांचा इरादा आहे. आपला राजकीय फायदा त्यांना करून घ्यायचा आहे. ओबीसी बांधवांनो त्यांचे ऐकू नका. शांत राहा, शहाणे व्हा. सध्या भुजबळ यांना संताजी धनाजी सारखे मराठे पाण्यात दिसत आहेत. त्यांच्या डावापासून सावध राहा," अशा सूचना जरांगेंनी मराठा समाजाला दिल्या.
"महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या भुजबळांनी स्वतःचे नाव शाळा, महाविद्यालयांना दिले, तर मराठ्यांनी आपल्या जमिनी शाळांसाठी दिल्या, असे सांगताना त्यांनी आमची लायकी काढता कशाला, आमची बरोबरी करू शकत नाही. येवल्याच्या येडपटाला पाडू, त्याला हिसका दाखवायला वेळ लागणार नाही, उंबऱ्याच्या बाहेर पडू देणार नाही," असा इशारा त्यांनी दिला.
"मराठा नेत्यांना आमच्या बापजाद्यांनी मोठे केले. जातीपेक्षा नेत्यांना मोठे मानू नका. तुमच्या लेकरांना आरक्षण मिळेपर्यंत पक्षबिक्ष काही नाही. गरजवंत मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात सहभागी व्हा. पुन्हा अशी संधी मराठ्यांना मिळणार नाही," असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. त्याच वेळी मराठ्यांवर अन्याय झाला तर गाठ आमच्याशी आहे, असा इशारा त्यांनी शिंदे सरकारला दिला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.