Manoj Jarange Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी शेतीही विकली; ना आरोग्य ना कुटुंबाची चिंता, फक्त आरक्षण अन् आरक्षणच!

Anand Surwase

Maratha Quota Row : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील 40 वर्षांपासून मराठा समाज आणि संघटनांकडून आंदोलने, मोर्चे, उपोषणे केली जात आहेत. मात्र, प्रत्येकवेळी मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचे घोंगडे भिजतच पडले आहे. आरक्षणाचा लढा सुरू असतानाच मागील दोन महिन्यांपासून एक नाव सध्या जोरदार चर्चेत आले आहे, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील!

आजपर्यंत अनेक आंदोलकांची नावे चर्चेच आली. मात्र, आता या आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व म्हणून मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ नये आणि गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जरांगे पाटील दिवस रात्र एक करून आरक्षणाचा लढा लढत आहेत.

1 सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातच अंतरवाली सराटीमध्ये 29 ऑगस्टपासून उपोषण आंदोलन सुरू होते.

मात्र, आंदोलनाच्या चौथ्या दिवशी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत निर्दयीपणे लाठीहल्ला केला. या हल्ल्यात अनेक मराठा आंदोलक गंभीर जखमी झाले. मात्र, याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आणि राज्यभरातून मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळायला सुरुवात झाली.

मराठा समाजाला आरक्षण हेच एकमेव ध्येय

मूळचे बीड जिल्ह्यातील मातोरी येथील रहिवासी असलेले जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या अंकुशनगर येथे वास्तव्यास असतात. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आजपर्यंत जवळपास 35 आंदोलने मोर्चे काढले आहेत.

संभाजीनगरचा मोर्चा, साष्टे पिंपळगावचे उपोषण, तसेच कोपर्डी घटनेतील आरोपींना मारहाण अशा अनेक प्रकरणात मनोज जरांगे आणि त्यांच्या शिवबा संघटनेचा सक्रिय सहभाग होता. राज्यातील गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे हे एकमेव ध्येय ठेवून जरांगे पाटील हे मागील 12 वर्षांपासून आरक्षणाचा लढा लढत आहेत. हा लढा लढण्यासाठी जरांगे पाटील यांनी स्वत:ची शेतीही विकली आहे.

मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही

एक तर आरक्षणाची विजयी यात्रा, नाही तर माझी अंत्ययात्रा निघेल असा निर्धार करून मराठा आरक्षणाचा लढा लढणारे जरांगे पाटील म्हणतात की, मी हा लढा लढतोय कारण मराठा समाजाचे ओबीसीमधून आरक्षण हे आपल्या हक्काचे आहे.

आजपर्यंतच्या समित्यांनी मराठा समाजाच्या कुणबी नोंदी असल्याचा कुठेच उल्लेख केला नाही. आम्हाला आरक्षण मिळत असताना मागील 70 वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने आम्हाला आरक्षणापासून लांब ठेवले गेले आहे.

त्यामुळे आता सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण मिळवताना जी काही बोलणी होतील ती सर्वांच्या समोर होतील. मी मराठा समाजाचे काही तरी देणे लागतो. मराठा समाजाने माझ्यावर इतका विश्वास दाखवला आहे. त्या समाजाशी कधीच गद्दारी करणार नसल्याचे जरांगे वेळोवेळी आपल्या सभांमधून स्पष्ट केले आहे.

जरांगे पाटलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष

मराठा आरक्षण मिळावे म्हणून सुरुवातीला 17 दिवस आणि त्यानंतर लगेच 9 दिवसांचे उपोषण केल्याने जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या किडन्यांना सूज आली असल्याचे डॉक्टरांचे सांगितले होते. यासाठी डॉक्टरांनी जरांगे यांना तब्बल २ महिन्यांचा सक्तीचा आराम करण्याचा सल्ला दिला होता.

मात्र, आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आला असून, आंदोलनास ढील दिली तर हाता तोंडाला आलेला घास हिरावला जाईल म्हणून जरांगे यांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करत महाराष्ट्रभर दौरा करण्याचा निर्णय घेतला.

आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या गाठी भेटी घ्यायला सुरुवात केली. अशक्तपणा असतानाही जरांगे पाटील यांनी दिवसातील 20-20 तास दौऱ्यासाठी वेळ देत आहेत. सध्या त्यांचे जेवण वाहनात होत असून, रात्रीचे जेवणाला पहाट उजडत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कुटुंबासाठी वेळ नाहीच

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करणारे जरांगे पाटील यांचा पत्नी, आई, वडील, चार मुले असा परिवार आहे. मात्र, मराठा समाजातील गोरगरीब मुलांच्या भविष्यासाठी आरक्षण मिळावे म्हणून जरांगे पाटील यांनी आपल्या कुटुंबाकडेही दुर्लक्ष केले आहे. जरांगे पाटील यांच्या डोक्यात फक्त मराठा आरक्षण आहे.

14 सप्टेंबरला आमरण उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगे पाटील यांनी घराकडे न जाता तिथेच ठिय्या मांडला होता. मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आला असल्याने जरांगे पाटील यांचा शक्य तेवढा जास्त वेळ आरक्षणाच्या लढ्यासाठी देण्याचा प्रयत्न आहे.

(Edited By: Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT