Manoj Jarange Patil : जरांगेंच्या रात्रीच्या जेवणाला उजाडते पहाट; उपोषणानंतर अंगात त्राण नाही म्हणून लढ्याला...

Maratha Reservation News : मराठा योद्धा न थकता समाजाच्या गाठीभेटीमध्ये व्यग्र
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maratha Aaraskhan News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणे, आंदोलन करीत आहेत. आरक्षणाच्या लढ्यात जरांगे पाटील यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देणे हे एकच ध्येय समोर ठेवलेल्या जरांगे पाटलांचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरू आहे.

या दौऱ्यातदेखील तहान,भूक आणि झोप हरपून जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करताना दिसून येत आहेत. एवढेच नाही तर रात्रीच्या जेवणाला पहाट उजडत असतानाही हा मराठा योद्धा न थकता समाजाच्या गाठीभेटीमध्ये व्यग्र असल्याचे त्यांच्या दौऱ्यात दिसून आले.

उपोषणानंतरही आरक्षणाच्या लढ्याला ढील नाही

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीसह संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे. त्यातच मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व करणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी चर्चेअंती सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत देत आपले बेमुदत उपोषण स्थगित केले. मात्र, सरकारने आरक्षणाचे आश्वासन दिले आणि उपोषणानंतर अंगात त्राण नाही म्हणून जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या लढ्याला ढील दिलेली नाही.

डॉक्टरांनी 2 महिन्यांचा सक्तीचा आराम घ्यायला सांगितला आहे; तरीही गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत माघार घ्यायची नाही, असा निश्चयच जरांगे पाटील यांनी केला आहे.

त्यामुळे रुग्णालयातून बाहेर पडताच जरांगे पाटील यांनी आपल्या आरक्षणाच्या आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. या टप्प्यात त्यांनी 15 नोव्हेंबरपासून महाराष्ट्राचा दौरा सुरू केला असून, ते सध्या 9 दिवसांसाठी पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.

Manoj Jarange Patil
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री म्हणून आषाढीला महापूजा कधी करणार? फडणवीस म्हणाले,...

भल्या पहाटे सभेला हजारोंची गर्दी

मराठा समाजाच्या भेटीगाठी घेऊन आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी जरांगे पाटील यांनी 15 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. या दौऱ्यात जरांगे पाटील हे प्रत्येक दिवशी न थकता 3 ते 4 सभा घेत आहेत. प्रत्येक ठिकाणच्या सभेला हजारो मराठा बांधव उपस्थित राहत असून, त्यांच्या सभेला तळपत्या उन्हात आणि कडाक्याच्या थंडीतदेखील मराठा समाज बांधव उपस्थित राहत आहेत.

सकाळी 10 च्या सभेसाठी जरांगे यांचा दौरा सकाळी 8.30 वाजल्यापासूनच सुरू होतो. त्यातच रस्त्यात ठिकठिकाणी जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मराठा समाजबांधव थांबत असल्याने त्यांचा ताफा प्रत्येक ठिकाणी थांबवावा लागत आहे.

त्यामुळे त्यांच्या नियोजित सभा सुमारे 3 ते 4 तास उशिराने पार पडत आहेत. त्यामुळे रात्रीची सभा पहाटे पार पडत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. भल्या पहाटेदेखील हजारो मराठा समाज बांधव जरांगे यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी गर्दी करून उपस्थित राहत आहेत.

दररोज शेकडो किलोमीटरचा प्रवास

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने जरांगे पाटील यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीच्या दृष्टीने वेळेत खान-पान होणे गरजेचे आहे.

मात्र, त्यांच्या या दौऱ्यात दररोज शेकडो किलोमीटरचा प्रवास, गावोगावी सत्कार, गाठीभेटी आणि त्यानंतर जाहीर सभा यामुळे जरांगे पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जेवायला आणि आराम करायलादेखील वेळ मिळत नाही.

नियोजित सभा आणि कार्यक्रम पार पडायला पहाट उजाडत आहे. परिणामी त्यांचे रात्रीचे जेवणदेखील पहाटे 4 नंतरच होत असून, त्यानंतर ते आराम करत आहेत.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वाहनातच जेवण

जरांगे पाटील यांच्या सभेसाठी आयोजकांकडून सर्व व्यवस्था केली जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. असे असले तरी जरांगे पाटील आणि त्यांच्या ताफ्यातील सर्व कार्यकर्ते आपापल्या वाहनातच जेवण करतात. जेवणासाठी अथवा नाष्त्यासाठी ते कोणत्या हॉटेल अथवा ढाब्यावर वेळ घालवत नाहीत.

प्रत्येकाच्या गाडीमध्ये जेवणाचे डबे दिले जातात. विशेष म्हणजे डब्यात डाळ किंवा थोडी भाजी, भाकर आणि भात इतकेच अन्न संपूर्ण कार्यकर्ते घेत असल्याचे दिसून आले. त्यातच सभा सत्कार समारंभ आणि त्यासाठी लागणारा वेळ यामुळे हे सर्व जण दुपारचे जेवण वाहनातच करत असून, रात्रीचे जेवण मात्र शेवटची सभा पार पडल्यानंतरच पहाटेच करावे लागत आहे.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : काहीही बोलणार्‍या भुजबळांनी लायकी सोडलीय; मनोज जरांगेंचे टीकास्त्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com