Junnar News: मनोज जरांगेंनी आरक्षणासाठी पुकारलेल्या लढ्यात आता राज्यातला संपूर्ण मराठा समाज एकवटला आहे. एवढंच नव्हे तर जरांगेंसह मोठ्या संख्येनं मराठा समाज मुंबईकडे निघाला आहे. एकीकडे शुक्रवारी (ता.29) होत असलेल्या आझाद मैदानातील आंदोलन काही तासांवर येऊन ठेपले असतानाच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी या लढ्याला नवं वळण दिलं आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटलांनी आता आरपारची लढाई छेडत आक्रमक पवित्रा घेतला आहे. याचवेळी त्यांनी थेट राज्यातलं सरकारच उलथवून टाकण्याची भाषाही माध्यमांशी बोलताना केली होती.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांना सरकार कसं उलथवून टाकणार यासंबंधीचा प्रश्न विचारण्यात आला. यावर जरांगेंनी राज्य सरकार मी नाही तर, मोदी आणि शाहचं उलथवून टाकतील असं म्हटलं. त्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहसाहेबांना एवढा डाग लागत असेल तर, तेच बरोबर राज्यातलं सरकार उलथवून टाकतील, असा खळबळजनक दावा जरांगेंनी केला आहे.
याचदरम्यान, या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे एकूण सात टप्पे असणार असल्याची घोषणाही जरांगेंनी केली. यावेळी आरक्षण कधी मिळणार यावर प्रतिक्रिया देतानाच मराठा आंदोलक जरांगेंनी यावेळी आणखीनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) हातातून संधी गेलेली नसून, त्यांनी गोरगरिबांच्या लेकरांना न्याय देण्याचं काम करावं असंही सांगितलं. यावेळी त्यांनी जेलमध्ये टाकण्याच्या आणि गोळ्या घालण्याचा भानगडीत सरकारनं राहू नये असेही स्पष्ट केले.
जरांगे म्हणाले, “गोरगरीब मराठ्यांची लेकरं पावसात मोटरसायकलवरुन येतात. त्याच्या पाठिमागे खूप मोठ्या वेदना आहेत. फडणवीसांनी या वेदना समजून घेणं गरजेचं आहे. मोटार सायकलवरुन मुसळधार पावसात प्रवास करणं अवघड गोष्ट आहे. रात्री पोरं भरपावसात प्रवास करतात, मुंबईच्या दिशेनं येत आहेत. त्याच्या पाठीमागचा उद्देश हट्ट नाही. समाजाच्या लोकांना न्याय मिळावा, यासाठी प्रत्येकजण झटतोय” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आझाद मैदानातील आंदोलकांच्या संख्येवरही मनोज जरांगे पाटील बोलले. “फडणवीस साहेब कोणाला थांबवणारं नाहीत. गोरगरीबांच्या वेदनाचं सन्मान करतील अशी आशा आहे. एकदिवसाची परवानगी दिली ही गोरगरीब मराठ्यांची चेष्टा आहे. अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्याच्या अंगावर जाळ टाकणं असल्याची प्रतिक्रियाही मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
तुम्ही मोठं मन दाखवायला हवं. गोरगरीबांच्या वेदना खूप आहेत. त्यांच्या वेदना लक्षात घेऊन मागण्या मान्य कराव्या. काल कौतुक केलं, तसं पुढेही करणार, असंही मनोज जरांगे म्हणाले. म्हणून मी काल सांगितलं, तसं आजही विनंती करुन सांगतो की, फडणवीससाहेबांना संधीचं सोनं करण्याची हीच योग्य संधी असल्याचंही जरांगेंनी सांगितलं.
गोरगरीब मराठ्यांची मनं जिंकण्याची. हेच मराठे गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचे, तुमचे उपकार विसरणार नाहीत. तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही, तुम्ही आमचे वैरी, शत्रू नाहीत” असंही जरांगे यांनी फडणवीसांना म्हटलं.
मनोज जरांगे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनासाठी परवानगी मिळावी. आम्ही नियमात राहून आंदोलन करु. आम्ही अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करु, कायद्याचे पालनही करु. आपल्याला कायद्याचं पालन करायचं आहे. हाता-तोंडाला आलेला घास घालवू नका, असं आवाहनही जरांगे यांनी केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.