Jalna News : जिल्हा परिषदेच्या शाळांची दयनीय अवस्था, सुविधांचा अभाव यावरून नेहमीच ओरड होत असते. काॅकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनीही सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरूस्तीसाठी मोहिम हाती घेतली आहे. हा विषय चर्चेत असतानाच जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील पाचशे शाळांचा दर्जेदार विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील दोन वर्षांत जालना जिल्ह्यातील पाचशे जिल्हा परिषद शाळांचा दर्जेदार विकास करण्याचे निर्देश पंकजा मुंडे यांनी मंत्रालयातील आढावा बैठकीत संबंधित विभागाला दिले. 'नवीन वर्षात नवी शाळा’ या संकल्पनेसह राज्याने जालन्याचा आदर्श घ्यावा, असे काम करा, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत केल्या.
जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासह आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून करून देण्यासाठी सर्वसमावेश आराखडा तयार करावा. पुढील दोन वर्षांत जिल्ह्यातील पाचशे शाळांचा दर्जेदार विकास करण्याचे नियोजन करावे, असे पंकजा मुंडे यांनी बैठकीत सांगितले.
जालना जिल्हा परिषद शाळांच्या विकासकामांचा आढावा त्यांनी या बैठकीत घेतला. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरिष बनसोडे, मनपा आयुक्त अंजली शर्मा यांच्यासह विविध अधिकारी दृरदृष्यप्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते.
यापूर्वीही 1 सप्टेंबर रोजीच्या बैठकीत पंकजा मुंडे यांनी जिल्हा परिषद शाळांचा आढावा घेऊन सूचना केल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शाळांचा सर्वे करून अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. आज त्यावर चर्चा करून त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
शाळा आणि अंगणवाड्यांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध होणारा निधी नियोजनबद्ध, काटेकोर आणि परिणामकारक पद्धतीने खर्च करावा. शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याबरोबरच विकासकामांचा दर्जाही उत्तम राखावा.
जिल्ह्यातील शाळांचा विकास करताना आदर्श शाळेची संकल्पना डोळ्यासमोर ठेवावी. शाळांची आकर्षक रंगरंगोटी, उत्तम परिसर, आवश्यक पायाभूत सुविधा आणि दर्जेदार कामांवर भर द्यावा. जालना जिल्ह्यात विकसित होणाऱ्या या आदर्श शाळांचे अनुकरण राज्यातील तसेच इतर राज्यांतील शाळांनी करावे, अशा गुणवत्तेचे काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
'नवीन वर्षात नवी शाळा' ही संकल्पना घेऊन संबंधित यंत्रणांनी अभियान स्वरूपात काम करावे. शाळांच्या विकासकामांबाबत पुढील आढावा बैठक आपण स्वतः जालना येथे घेणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. या योजनांसाठी उपलब्ध निधी निर्धारित वेळेत खर्च करावा. मंजूर कामांना कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही, याची दक्षता घेऊन ती गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकार्यांना दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.