Baban Gitte Will Join NCP  Sarkarnama
मराठवाडा

Sharad Pawar Beed Rally : पवारांच्या सभेसाठी धनंजय मुंडेंच्या परळीतून ७०० गाड्या रवाना; हा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश

सरकारनामा ब्यूरो

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (ता. १७ ऑगस्ट) मुंडेंच्या बालेकिल्ल्यात बीडमध्ये सभा होत आहे. त्या सभेसाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातून सुमारे ७०० गाड्या बीडकडे रवाना झाल्या आहेत. तसेच, जनक्रांती सेनेचे प्रमुख बबनराव गिते हे या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. (700 cars left from Dhananjay Munde's Parli for Pawar's meeting)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. बीड जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी अजितदादांना साथ दिली आहे. केवळ बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे पवारांसोबत आहेत. त्यांनी आज बीडमध्ये शरद पवार यांच्या सभेचे आयोजन केले आहे. बंडानंतर पवारांची पहिलीच सभा होत असल्याने मराठवाड्यात त्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी बुधवारी विविध कार्यक्रमाला हजेरी लावली. तसेच, पत्रकार परिषद घेत बंडखोरांना गर्भित इशाराही दिला आहे. त्यात त्यांनी माझा फोटो लावू नका; अन्यथा कोर्टात खेचेन असा थेट इशाराच देऊन टाकला. तसेच, एस काँग्रेस काढल्यानंतर बीड जिल्ह्याने माझ्या पक्षाचे सर्वच सर्व उमेदवार निवडून दिले होते, असे सांगून मला चिन्हाची चिंता नाही, मी अनेकदा नव्या चिन्हावर लढला आहे, असे स्पष्ट केले.

दरम्यान, पवार हे बीडच्या सभेसाठी संभाजीनगरमधून रवाना झाले आहेत. त्यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात येत आहे. तसेच, पवार हे सभेअगोदर रॅलीत सहभागी होणार आहेत. या सभेसाठी पवार गटाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. धनंजय मुंडेंच्या परळीमधून तब्बल सातशे गाड्या सभेसाठी रवाना झाल्या आहेत.

जनक्रांती सेनेचे प्रमुख बबन गित्ते हे शक्तीप्रदर्शन करत तब्बल सातशे गाड्या घेऊन बीडच्या दिशेने रवाना झाले आहेत. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांना पर्याय म्हणून ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यातून धनंजय मुंडे यांना शह देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी मी राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. महाविकास आघाडीची सत्ता यावी, यासासाठी आम्ही प्रभू वैद्यनाथांना साकडे घातले आहे, असेही बबन गित्ते यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT