Abdul Sattar_Idris Multani 
मराठवाडा

Sattar-Multani: एक रस्ता, दोन नेते! चाळीस वर्षानंतर कामाला मंजुरी, श्रेयासाठी सत्तार-मुलतानी यांच्यात रस्सीखेच

Abdul Satta Idris Multani tug of war for credit of road construction: सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात आता नवा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे.

Jagdish Pansare

Abdul Satta Idris Multani News: सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघावर गेल्या 20 वर्षापासून वर्चस्व राखून असलेले विद्यमान आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार आणि नव्यानेच त्यांना आव्हान देऊ पाहणारे भाजपाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांच्यात सध्या राजकीय स्पर्धा सुरू आहे.

2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांच्या कानाजवळून गोळी जावी, असाच काहीसा प्रकार घडला. लाखांच्या मताधिक्यांचा दावा करणाऱ्या सत्तार यांचा केवळ 2,420 मतांनी विजय झाला. सत्तार यांच्या वर्चस्वाला हा हादरा होता. पुढे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सोयगाव, सिल्लोड पंचायत समितीमध्ये भाजपाने सत्तार यांना रोखत सत्ता मिळवली.

अर्थात या सत्तेमध्ये भाजपाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांचा मोठा वाटा होता. अब्दुल सत्तार यांची एकाधिकारशाही संपवायची असेल तर सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात दुसरे अल्पसंख्याक नेतृत्व उभे करावे लागेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेरले आणि मुलतानी यांना बळ द्यायला सुरूवात केली.

मुस्लिम समाजाच्या शासनाच्या अभ्यास समितीच्या अध्यक्षपदाची मुलतानी यांच्या गळ्यात पडलेली माळ हे त्याचे ताजे उदाहरण म्हणावे लागेल. वीस-पंचवीस वर्षात अनेकदा मंत्री राहिलेले अब्दुल सत्तार माजी झालेले असताना देवेंद्र फडणवीस यांनी इद्रिस मुलतानी यांच्यासारख्या अल्पसंख्याक चेहऱ्याला राज्य मंत्रीपदाच्या दर्जाचे पद देत मोठी खेळी केली. देवाभाऊंकडून बूस्ट मिळाल्यानंतर मुलतानी यांची गाडीही सुसाट सुटल्याचे चित्र आहे.

सोयगाव तालुक्यातील गोद्री–पळसखेडा–टिटवी–सावळदबारा रस्त्याचा गेली पंचवीस-तीस वर्ष रखडत पडलेला प्रश्न अखेर वन विभागाच्या मंजुरीनंतर मार्गी लागला आहे. दोन महिन्यापूर्वी इद्रीस मुलतानी यांनी काट्या कुट्यातून मार्ग काढत या नियोजित रस्त्याच्या जागेची पाहणी केली होती. चार ऑगस्ट रोजी मुंबईत वन मंत्री गणेश नाईक यांची भेट घेत याच रस्त्याच्या कामाला मंजुरी द्यावी, अशी मागणी करणारे पत्र मुलतानी यांनी दिले होते.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांनीही साडेतीन-चार किलोमीटर पायी जात याच रस्त्याची पाहणी केली. आता या रस्त्याला मिळालेल्या मंजुरीचे श्रेय वीस वर्षापासून आमदार, मंत्री राहिलेल्या सत्तारांचे की मग तीन महिन्यापूर्वी राज्य मंत्रीपदाचे पद मिळालेल्या भाजपाच्या अल्पसंख्याक विभागाचे दुसऱ्यांदा प्रदेशाध्यक्ष झालेल्या इद्रीस मुलतानी यांचे? यावरून तालुक्यात स्पर्धा लागली आहे. दोघांकडून कामाचे श्रेय घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

वीस वर्षात रस्ता का नाही?

चाळीस वर्षांची प्रतीक्षा संपली, नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान अशी पोस्ट टाकत इद्रीस मुलतानी यांनी या कामाचे श्रेय घेतले आहे. रावळा ते पळसखेडा टिटवी वनविभागातून जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली. गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाचचे तीन वेळा खोटे उद्घाटन करून श्रेय घेणाऱ्यांना आता जनतेनेच प्रश्न विचारावेत, असा टोलाही यातून मुलतानी यांनी विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांना लगावला आहे.

तसेच गेल्या 25 वर्षांपासून झोपलेल्या लोकप्रतिनिधींना पुन्हा एकदा याच रस्त्याचे उद्घाटन करण्याची धडपड का झाली? हा सवालही नागरिक उपस्थित करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर अवघ्या तीन महिन्यांत प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. जनतेला उद्घाटनांचे राजकारण नको, प्रत्यक्ष काम आणि विकास हवा आहे, असा टोलाही मुलतीनी यांनी सोशल मिडिया पोस्टमधून सत्तारांना लगावला आहे.

यापुर्वी सावळदबारा तीर्थ क्षेत्राला 'ब' दर्जा, सिल्लोड येथे जिल्हा सत्र न्यायालय (वरिष्ठ स्तर) मंजूर झाल्याचे श्रेय देखील इद्रिस मुलतानी यांनी घेतले. याबद्दल त्यांचा सिल्लोड तालुका वकील संघाच्यावतीने सत्कारही करण्यात आला होता. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच तीर्थक्षेत्र चक्रधर स्वामी सावळदबारा मंदिराला महाराष्ट्र शासनाने ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देत 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचा त्यांचा दावा आहे.

सत्तारांचा दावा, 2023 मध्ये मंजुरी..

तर दुसरीकडे आमदार अब्दुल सत्तार यांनी रावळा ते सावळदबारा रस्ताकामाला मिळालेली मंजुरी हे आपल्या पाठपुराव्याचे यश असल्याचे सांगत नुकतीच या कामाची पाहणी केली आहे. 20 फेब्रुवारी 2023 मध्येच या रस्त्याचा कामाला मंजुरी मिळाली होती, असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. भुसंपादनाची प्रक्रिया, रस्त्याचे सीमांकन, मार्गातील अडथळे हटवणे या कामासाठी वेळ लागला. शिवाय वन विभागाच्या अखत्यारित हा सगळा भाग असल्याने प्रत्यक्ष कामाला विलंब झाल्याचे त्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT