

Amit Malviya replaces by Deepak Mhaske: भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा झाली असून यामध्ये बऱ्याच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे भाजपचे सोशल मीडिया प्रमुख अमित मालवीय यांना पदावरुन दूर करण्यात आलं असून त्यांच्या जागी दीपक म्हस्के यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
जेव्हापासून मोदी सरकार सत्तेत आलं आहे, तेव्हापासून मालवीय यांनी एकहाती सोशल मीडियाची धुरा सांभाळली होती. त्यांच्या नियुक्तीपासून आत्तापर्यंतच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात व्हॉट्सअॅप नेटवर्क, हॅशटॅग मोहिमा, विरोधकांवर काउंटर-अटॅक, स्वयंसेवक प्रशिक्षण आणि निवडणुकांमधील डिजिटल एज यावर त्यांनी दीर्घकाळ काम केलं. विरोधकांना आव्हान देताना काऊंटर नरेटिव्ह तयार करण्यात भाजपच्या आयटीसेलचा मोठा हात होता. अनेकदा अमित मालवीय यांच्यावर फेक न्यूज आणि नरेटिव्ह चालवल्याचेही आरोप झाले आहेत. पण त्यांच्या काळात भाजपच्या सोशळ मीडियाचा रिच प्रचंड वाढला आणि फॉलोवर्सची संख्याही.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी 'चौकदार चोर है' या टीकेला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी 'मै भी चौकदार' नावानं भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांची सोशल मीडियावरील प्रोफाईल नेम चेंज करुन नवी मोहिम सुरु केली होती. यासाठी डीपी देखील बदलले गेले आणि मोठ्या प्रमाणावर ही मोहिम व्हायरलही केली गेली. तसंच पश्चिम बंगालमध्ये BengalBurning, SaveBengal, PAY2TMC, PaltanoDorkorChaiBJPSorkor, Brigade4Poribortan हे हॅशटॅग चालवले. 'Nation With Namo', 'Bharat Ke Mann Ki Baat' हे कायमस्वरुपी हॅशटॅगही चालवले.
पण मोठ्या प्रमाणावर देशातील जनतेसाठी नरेटिव्ह सेट करणाऱ्या किंबहुना त्याचा प्रचंड अनुभव असतानाही या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात कॉक्रोच जनता पार्टी नावाची चळवळ सोशल मीडियात सुरु झाली. भाजपच्या नावाला काऊंटर म्हणूनच ही मोहिम राबवली गेली. या मोहिमेला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला, हा प्रतिसाद इतका प्रचंड होता की, त्यानं भाजपच्या एकूण फॉलोवर्सलाही मागे टाकलं. त्यामुळं स्पष्टपणे भाजपचं आयटी सेल फेल झाल्याचं दिसून येत होतं. कॉक्रोच जनता पार्टीचं सोशल मीडियातून सुरु झालेलं आंदोलन इतकं फोफावलं की, दिल्लीत या आंदोलनानं जेनझींना अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून खेचून आणलं. तसंच भाजपमध्ये मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची नसलेली पद्धत पाडावी लागली. मोदींना थेट सोशल मीडियाच्या मैदानात उतरुन फ्रेंड्स म्हणत जेनझींवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला. पण तो ही फेल गेला, म्हणजेच देशात भाजपविरोधात इतकं सगळं सोशल मीडियावर घडत असताना भाजपची आयटी सेल मात्र हतबल झाल्याची दिसत होती. कदाचित त्याचमुळं अमित मालवीय यांना आता सुट्टी देण्याचा विचार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केला असावा.
भाजपचे नवे सोशल मीडिया प्रमुख म्हणून नियुक्त झालेले दीपक म्हस्के (वय ५८) हे छत्तीसगडमधील रायपूरचे रहिवासी आहेत. पक्षामध्ये आयटी (IT) आणि सोशल मीडिया विभागात काम करण्याचा म्हस्के यांना सुमारे १५ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी बिहार, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये सोशल मीडिया मोहिमांचे नेतृत्व केलं आहे. या सर्व निवडणुकांमध्ये भाजपनं दणदणीत विजय मिळवला होता.
दीपक म्हस्के हे भाजपमधील पहिल्या पिढीतील नेते असून त्यांचे बंधू तेज प्रताप म्हस्के हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) जोडलेले आहेत. म्हस्के यांनी आजवर कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. १४ ऑगस्ट रोजी म्हस्के यांनी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन यांची भेट घेतली होती, याची माहिती त्यांनी आपल्या सोशल मीडियावरुनही दिली होती. त्यानंतर तीनच दिवसांत पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा होऊन दीपक म्हस्के यांची यात सोशल मीडिया प्रमुख म्हणून नियुक्ती झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.