Abdul Sattar Vs Hemant Patil Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar Vs Hemant Patil : एकमेकांना शिव्या हासडल्यानंतर सत्तार- पाटील आले समोरासमोर अन्...

Jagdish Pansare

Hingoli News : दोनच दिवसांपूर्वी एकमेकांना शिव्या हासडणारे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील हे बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एकाच व्यासपीठावर आले होते.

त्यामुळे पुढे काय घडणार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र या दोघांनीही समोरासमोर आल्यानंतर एकमेकांकडे पाहिलंही नाही. तर विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या वादाला फारसे महत्व दिले नसल्याचे दिसून आले.

हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्याला हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) व खासदार हेमंत पाटील दोघेही उपस्थित होते. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सत्तार आणि पाटील यांनी एकमेकांवर टक्केवारी आणि भ्रष्टाचाराचे आरोप करत शिव्या हासडल्या होत्या. याचा ऑडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्या समक्ष हे दोघेही एकाच व्यासपीठावर हजर होते. मात्र डीपीडीसीच्या बैठकीत झालेली खडाजंगी, एकमेकांवर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप शिवीगाळ आणि दिलेले आव्हान या पार्श्वभूमीवर दोघेही सुरक्षित अंतर राखून होते. या दोघांनी एकमेकांशी बोलणे, पाहणेही टाळले. डीपीडीसी मध्ये झालेला प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्याही कानावर गेला होता. मात्र त्यांनीही या दोघांना एकत्र आणण्याचा किंवा त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला नाही.

मुळात मुख्यमंत्र्यांनी शिवसंकल्प मेळाव्याला अत्यंत कमी वेळ दिला. त्यांनी आपले भाषणही अवघ्या पंधरा मिनिटात आटोपले आणि मुंबईकडे रवाना झाले. त्यामुळे शिंदे-सत्तार वादातही त्यांनी या दौऱ्यात कुठलीही मध्यस्थी करण्याचा किंवा दोघांमध्ये दिलजमाई घडवून आणण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळातही पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार पाटील(Hemant Patil) यांच्यात वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डीपीडीसीमधून चुकीची कामे होत असल्यामुळे मंत्री अब्दुल सत्तार आणि हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्यात वाद झाल्याचा दावा खासदार संजय जाधव यांनी केला. पालकमंत्री नियमबाह्य पद्धतीने कामे करत आहेत. त्यामुळे नियोजन समितीचे प्रस्ताव न्यायालयीन प्रक्रियेत अडकून पडले आहेत. हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील हे एकाच पक्षाचे असूनसुद्धा त्यांच्यात शाब्दिक चकमकी होत आहेत. त्यामुळे काहीतरी चुकीचे होत आहे हे मान्य केले, पाहिजे असा टोलाही संजय जाधव यांनी लगावला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT