Abdul Sattar Meets Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar: एकनाथ शिंदे, शिरसाट, भुमरेंवर हल्ला होताच, अब्दुल सत्तार पॅचअपसाठी धावले!

Abdul Sattar Meets Manoj Jarange Patil:आतापर्यंत शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत हे मध्यस्थी करत होते. मात्र आता त्यांच्याऐवजी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचे दिसते.

Jagdish Pansare

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर जाहीरपणे टीका केली. ओबीसी कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द ठरवल्यानंतर जरांगे पाटील यांचा पारा चढला होता. दोन जिल्हा परिषद सदस्य आणि एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर त्यांच्यावर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ शिंदे, खासदार संदीपान भुमरे आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर जरांगे पाटील यांचा विशेष राग आहे. मराठा समाजाच्या विरोधात शिरसाट यांनी बैठका घेतल्या, त्यांना शिंदेंनी त्या घ्यायला सांगितल्या, भुमरे मामांनी त्यांना साथ दिली, असे म्हणत जरांगे पाटील यांनी या सगळ्यांवर तोंडसुख घेतले होते.

शिवसेनेवर जरांगे पाटील नाराज झाल्याने त्यांचा राग शांत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आतापर्यंत शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत हे मध्यस्थी करत होते. मात्र आता त्यांच्याऐवजी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचे दिसते.

आज सत्तार यांनी अचनाक अंतरवालीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. 'तुम्ही संघर्ष योद्धा आहात, काही चुका झाल्या असतील, गैरसमज झाला असेल तर चर्चा करून ते दूर करता येतील. पण त्यासाठी चर्चा करावी लागेल' अशी साद सत्तार यांनी या भेटीत त्यांना घातली.

यावेळीही जरांगे पाटील शिरसाट यांचे नाव घेत आम्ही त्यांच्यावर, शिंदेसाहेबांवर जीवापाड प्रेम केले, त्यांनी असे करायला नको होते, असे म्हणत रोष व्यक्त केला. तुमच्या मैत्री पेक्षा मला माझा समाज महत्त्वाचा आहे. मैत्री सांभाळण्यासाठी मी समाजाचे नुकसान होऊ देणार नाही, असे जरांगे पाटील यांनी सत्तार यांना स्पष्टच सांगीतले. सत्तार-जरांगे पाटील यांच्यात बराच वेळ चर्चा झाली.

सत्तारांवर जबाबदारी का?

एकनाथ शिंदे, संदीपान भुमरे, संजय शिरसाट यांच्यावर जरांगे पाटील नाराज असल्याने त्यांची मनधरणी करण्यासाठी अब्दुल सत्तार यांनाच का पाठवण्यात आले? याबद्दलही चर्चा सुरू आहे. अब्दुल सत्तार आणि जरांगे पाटील यांच्यात अनेकदा भेटीगाठी झाल्या आहेत.

जालना लोकसभा मतदारसंघात भाजपाचे पाच टर्म खासदार राहिलेल्या माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्याविरोधात काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्या विजयात जरांगे फॅक्टरचा मोठा वाटा होता. अब्दुल सत्तार यांनीही महायुती असूनही रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काम केले होते. तर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात लावलेले बॅनर दानवेंच्या भोकरदनमध्ये फाडण्यात आल्यानंतर जरांगे पाटील यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर थेट निशाणा साधला होता.

जरांगे पाटील यांच्या नाराजीचा फटका दानवे यांना लोकसभेला बसला आणि अब्दुल सत्तार यांचे राजकीय मित्र असलेले कल्याण काळे खासदार झाले. सत्तार यांनी काट्या ने काटा काढल्याची चर्चा तेव्हा जिल्ह्यात रंगली होती. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले तेव्हा मुस्लिम आरक्षणाला पाठिंबा दर्शवला होता. तेव्हा पासून सत्तार आणि जरांगे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आता सत्तार यांची शिवसेनेच्या नेत्याबद्दल असलेली नाराजी पाहता त्यांच्यावर मध्यस्थीची जबाबदारी टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT