MLC Election 2026 : 'भाजप शिवसेना पक्ष संपवू पाहात आहेत. त्यांनी आधी आमचे हात पाय तोडले, आता तर मुडकंच उडवेल', असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला होता. याचे मोठे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले. भाजपचे नेतेही सत्तार यांच्यावर तुटून पडले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाराजी व्यक्त केली. ज्यानंतर तात्काळ उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना मुंबईत बोलावून घेतले.
काल साडेतीन तास झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर अब्दुल सत्तार यांनी बंडाची तलवार म्यान केली. शिंदेंनी कडक शब्दात महायुतीचा धर्म पाळायचा आहे, माघार घ्या, असे सुनावले. त्यानंतर सत्तार यांनी शिंदे यांच्या आदेशाचे पालन केले जाईल, असे माध्यमांसमोर येत जाहीर केले. शिंदे यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत त्यांनी शिवसेनेतील काही नेत्यांच्याही तक्रारी केल्या. भाजपला रोखा अन्यथा पक्ष संपेल, असा धोक्याचा इशारा द्यायलाही सत्तार विसरले नाहीत.
छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ भाजपने संख्याबळ अधिक असल्याचा दावा करत शिवसेनेकडून हिरावून घेतला. महापालिका, जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून शिवसेनेला भाजपच्या नेत्यांनी दूर ठेवले, असे आरोप करत भाजप शिवसेनेच्या त्यागाला विसरली म्हणत सत्तार यांनी विधान परिषद निवडणुकीत बंडाचे निशाण फडकावले.
सत्तार यांचे सुपूत्र सिल्लोड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समीर सत्तार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. अब्दुल सत्तार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांची भेट घेत दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत असे, विधान बेधडकपणे केले. यावरून राज्याचे राजकारण ढवळून निघाले. ऐन विधान परिषदेच्या निवडणुकीतच अब्दुल सत्तार यांनी भाजपच्या विरोधात दंड थोपटल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची तातडीने दखल घेत त्यांना मुंबईत चर्चेसाठी बोलावले.
तत्पूर्वी शिंदे यांनी सत्तार यांच्याशी चर्चा करत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मोठ्या भावाकडून आमचा पक्ष संपवला जात आहे. जिल्ह्यात आमच्याबाबत अनेक घडामोडी घडत आहेत, निधी मिळत नाही. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडूनही अडवणूक केली जात असल्याचा घरचा आहेर सत्तार यांनी दिला. ही परिस्थिती कायम राहिली तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमचं काय होईल? असा सवाल सत्तार यांनी बैठकीत उपस्थित केला.
महायुती असून जर अशी वागणूक मिळत असेल तर पश्चातापाच्या गोष्टी मनात येतात. नाराजी होती, म्हणून हे पाऊल उचलले. 2029 पर्यंत आमच्या नेत्यांनी वेळीच या गोष्टीची दखल घेतली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, असेही सत्तार म्हणाले. यावरून शिंदेंनी त्यांची दखल घेतली आहे. तसेच पक्षातही काही नाराजी होती, त्यावरही सूचना शिंदेंनी दिल्या असल्याचे सत्तार म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या आदेशानूसार विधान परिषद निवडणुकीत आपण महायुतीचा धर्म पाळणार आहोत. समीर सत्तार यांनी दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येईल, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीतून माघार घेत असले तरी सत्तार यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून होणारा त्रास, भाजपकडून सातत्याने होणारी अडवणूक आणि शिवसेनेला कुमकूवत करण्याचे सुरू असलेले काम याला चाप लावा, अशी मागणी अब्दुल सत्तार यांनी शिंदे यांच्याकडे केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.