Abdul Sattar News  Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar News : मेळाव्याचे निमंत्रण द्यायला गेले अन् सत्तारांना गावकऱ्यांनी पिटाळून लावले...

Jagdish Pansare

Marathwada Latest News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याचे निमंत्रण मतदारसंघातील गावात देण्यासाठी गेलेल्या अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तारांना वेगळाच अनुभव आला. (Shivsena News) बोरगाव सावरणी गावातील गावकऱ्यांनी अब्दुल सत्तार यांना अक्षरशः पिटाळून लावले. `सत्तार चले जाव`च्या घोषणा देत संतप्त गावकरी आणि तरुणांनी सत्तारांचा ताफा आल्या पावली परत पाठवले. रविवारी हा प्रकार घडल्याने याची जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे.

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघावर मजबूत पकड असलेल्या सत्तार (Abdul Sattar) व त्यांच्यासाठी हा अनुभव धक्कादायक आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय नेते, मंत्री, आमदार, खासदारांना गावात येण्यास बंदी केली आहे. (Shivsena) त्याचे पडसाद मराठवाड्यातील पाचशेहून अधिक गावांतही उमटले आहे.

सत्तार यांना करण्यात आलेली गावबंदी ही वेगळ्या कारणावरून करण्यात आल्याचे सांगितले जाते. (Marathwada) दसरा मेळाव्यासाठी सिल्लोड सोयगाव मतदारसंघातून सर्वाधिक गर्दी जमवण्याचे उद्दिष्ट घेऊन अब्दुल सत्तार यांनी कामाला सुरुवात केली आहे. गावागावांत बैठक आणि निमंत्रण पत्रिका वाटून ते लोकांना मुंबईतील दसरा मेळाव्याला येण्याचे आवाहन करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबईला जाण्यासाठी २०० बसेस

लोकांना घेऊन जाण्यासाठी सत्तार यांनी तब्बल दोनशे बस बुक केल्या असून, आज सायंकाळपासूनच त्या लोकांना घेऊन मुंबईकडे रवाना करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने अब्दुल सत्तार यांचा ताफा रविवारी बोरगाव सावरणी गावात गेला होता; परंतु सत्तार यांना गावकऱ्यांनी गाडीतूनही खाली उतरू दिले नाही. ताफा गावात येणार असल्याचे माहीत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते.

सत्तारांची गाडी गावात शिरताच उपस्थित तरुणांनी `सत्तार चले जाव`,च्या घोषणा सुरू केल्या. जमावाचे उग्र रूप पाहता सत्तारांनी गावात न थांबण्याचा निर्णय घेत ताफा सुसाट वेगाने बाहेर नेला. गावकरी सत्तारावर एवढे का संतापले होते? याचे कारण शोधले तेव्हा गावातील दोन मुस्लिम महिलांच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीत सत्तार यांनी मदत केली नाही, याचा राग गावकऱ्यांमध्ये असल्याचे समोर आले.

या महिलांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मृत महिलांच्या नातेवाइकांसह गावकऱ्यांनी केली होती. परंतु, पोलिसांनी या प्रकरणात कुठलीही चौकशी केली नाही, अब्दुल सत्तार यांनीही या प्रकरणात लक्ष घातले नाही, असा आरोप गावकऱ्यांचा होता.

या रागातूनच लोकांना सत्तार यांना गावात येऊ द्यायचे नाही, अशी भूमिका घेतली होती. दसरा मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिका देण्यासाठी सत्तार गावात येणार असल्याची संधी मिळताच गावकऱ्यांनी आपला विरोध दर्शवत त्यांना माघारी धाडले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT