Chandrakant Khaire Meet Cockroach Janata Party chief abhijeet dipke; Sanjay Shirsat and Bacchu Kadu sarkarnama
मराठवाडा

Chandrakant khaire Meet Abhijeet Dipke : दोन्ही शिवसेना अभिजीत दिपकेच्या प्रेमात; शिरसाट, बच्चू कडू पाठोपाठ आता चंद्रकांत खैरेही भेटीला

Sanjay Shirsat Bacchu Kadu and Chandrakant Khaire Meet abhijeet dipke After Jantar Mantar Protest : कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी केंद्रातील मोदी सरकार विरोधात आंदोलन उभारत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. ज्यानंतर आता ते चांगलेच चर्चेत आहेत.

Jagdish Pansare

Shivsena Politics : नीट पेपरफुटीच्या प्रकरणावरून केंद्रातील मोदी सरकारविरोधात दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणारे कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. 36 दिवसांचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर दिपके यांचे काल छत्रपती संभाजीनगर येथे राहत्या घरी आगमन झाले. तेव्हापासून त्यांना भेटणाऱ्या समर्थकांची गर्दी सुरू आहे. यात विशिष्ट राजकीय पक्षांच्या मंत्री आणि नेत्यांचाही समावेश आहे.

दिल्लीतील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अभिजीत दिपके यांच्या आई-वडिलांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर आज शिवसेनेचे दुसरे नेते आमदार बच्चू कडू यांनीही सायंकाळी अभिजीत दिपके आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही अभिजीत दिपके व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत आंदोलन यशस्वी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यामुळे आता दोन्ही शिवसेना व त्यांचे नेते अभिजीत दिपके यांच्या प्रेमात पडल्याची कुजबूज सुरू असून, राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत.

दिल्ली येथे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नाव संपूर्ण देशात गाजवल्याबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा लढा यशस्वी केल्याबद्दल चंद्रकांत खैरे यांनी अभिजीत दिपके यांचा सत्कार करीत, सदर अभिमानास्पद आंदोलन छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासात नोंदविले जाईल, असे मत व्यक्त केले. यावेळी अभिजीत दिपके आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी खैरे यांनी मोबाईलवरून संवाद साधून दिला.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी अभिजीत दिपके यांना मातोश्रीवर भेटीचे आमंत्रण दिले. त्यांनी अभिजीत दिपके यांच्या आई-वडिलांविषयी संवाद साधला आणि त्यांचेही कौतुक केले. मातोश्री, मुंबई येथे भेटीचे आमंत्रण देण्यात आले. सदर भेटीदरम्यान अभिजीत दिपके यांच्या आई-वडिलांनी चंद्रकांत खैरे यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात केलेल्या मदतीची आठवण करून देत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी दिल्ली येथे जंतर-मंतरवर जाऊन अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता. कुठलीही मदत लागली तर फोन करा, असे म्हणत त्यांनी अभिजीत दिपके आणि विद्यार्थ्यांनी घेतलेली भूमिका योग्य असून, त्यावर ठाम रहा, तुमच्या सोबत आहोत, असे आश्वासन दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.