Latur DCC Bank Politics; Sambhaji Patil Nilangekar, Dhiraj Deshmukh And Abhimanyu Pawar  Sarkarnama
मराठवाडा

Abhimanyu Pawar : सहकाराच्या निमित्ताने औशात नवे राजकीय समीकरण; पवार-देशमुखांची जवळीक निलंगेकरांसाठी धोक्याची घंटा!

Latur Cooperative Politics : लातूर जिल्ह्याच्या राजकारणात नवे राजकीय समीकरण उदयास येताना दिसत असून सहकार चळवळ गतिमान करण्याच्या नावाखाली कट्टर विरोधकांची सुर जुळताना दिसत आहेत.

Jagdish Pansare

Latur politics : जलील पठाण

लातूर जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांचे विरोधक म्हणून ओळखले जाणारे आमदार अभिमन्यू पवार आणि देशमुख गट आता सहकाराच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येत असल्याचे चित्र आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार पवार यांच्या पत्नी शोभा पवार यांची औसा सोसायटी गटातून बिनविरोध निवड झाल्याने या नव्या राजकीय समीकरणाची चर्चा अधिकच रंगली आहे.

सहकार चळवळ गतिमान करण्याच्या नावाखाली जुळलेले हे सूर भविष्यातील राजकारणाची नवी दिशा ठरवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, या जवळिकीमुळे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या राजकीय तटबंदीला धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

जिल्ह्यात संभाजी पाटील निलंगेकर आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यातील राजकीय मतभेद सर्वश्रुत आहेत. मात्र, अलीकडच्या काळात पवार आणि काँग्रेसच्या देशमुख गटातील वाढती जवळीक अनेक राजकीय समीकरणांना छेद देणारी ठरत आहे. बेलकुंड येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याला आमदार पवार यांनी शिफारस करून मिळवून दिलेली ११० कोटी रुपयांची मदत असो किंवा कारखान्यातील डिस्टिलरी प्रकल्पाच्या उद्घाटनाला लावलेली उपस्थिती असो, या घटनांकडे पवार-देशमुख गटातील वाढत्या समन्वयाचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.

साखर कारखान्याच्या निमित्ताने जुळलेले हे सूर आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही अधिक दृढ झाल्याचे दिसते. शोभा पवार यांची बिनविरोध निवड ही केवळ सहकारातील निवडणूक नसून त्यामागे मोठे राजकीय गणित असल्याची चर्चा आहे. एकीकडे आमदार पवार महायुतीच्या राजकीय बैठकांपासून दूर राहतात, तर दुसरीकडे त्यांच्या कुटुंबातील सदस्याला बिनविरोध निवडून आणण्यासाठी विरोधी गटाशी जुळवून घेतले जाते. त्यामुळे या घडामोडींकडे राजकीय खेळी म्हणून पाहिले जात आहे.

दरम्यान, महायुतीचे प्रमुख घटक असलेले सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनीही देशमुख गटाशी जुळवून घेतल्याने संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासमोरील राजकीय आव्हान वाढल्याचे बोलले जात आहे. निलंगा मतदारसंघात चुलती विरुद्ध पुतण्या अशी संभाव्य लढत चर्चेत असतानाच उमेदवारांच्या पळवापळवीवरून निलंगेकरांवर आरोप झाले असून, याप्रकरणी गुन्हाही नोंद झाल्याची चर्चा राजकीय वातावरण अधिक तापवणारी ठरली आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर यांनी महायुती अभेद्य असल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षातील राजकीय घडामोडी वेगळेच चित्र दाखवत आहेत. महायुतीतील घटकांमध्ये सर्व काही आलबेल आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. सोयीच्या राजकारणासाठी सोयीचा माणूस जवळ करण्यात देशमुख गट यशस्वी ठरल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे.

एकंदरीत, 'सहकारासाठी सहकार्य' या गोंडस भूमिकेतून औसा तालुक्यात आकाराला येत असलेले पवार-देशमुखांचे नवे समीकरण जिल्ह्याच्या राजकारणात कोणाची ताकद वाढवणार आणि कोणाची राजकीय कोंडी करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र, या घडामोडींमुळे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या राजकीय गोटात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT