Mp.Pratap Patil Chikhlikar-Ashok Chavan
Mp.Pratap Patil Chikhlikar-Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

विश्वासदर्शक ठरावाला गैरहजर राहिले, नामांतराला पाठिंबा दिला, आता भाजपमध्ये या..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे अशोक चव्हाण प्रेम सध्या चांगलेच उफाळून आले आहे. काल मुंबईत पत्रकारांशी बोलतांना चिखलीकरांनी चव्हाण यांचे कौतुक केले होते. तोच मुद्दा उपस्थितीत करत चिखलीकरांनी अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) थेट भाजपमध्ये येण्याचीच आॅफर दिली आहे. चव्हाण भाजपमध्ये आले तर एक कार्यकर्ता म्हणून आपण त्यांचे स्वागतच करू असेही ते म्हणाले.

नांदेड जिल्ह्यातील राजकारणातील दोन विरुद्ध टोक म्हणून अशोक चव्हाण आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) ओळखले जातात. पण शिंदे-फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आमदार अशोक चव्हाण व त्यांचे जिल्ह्यातील चार समर्थक आमदार गैरहजर राहिले. (Marathwada) अप्रत्यक्षरित्या त्यांनी या सरकारला पाठिंबाच दिला असा दावा करत चिखलीकरांनी त्यांचे आभार मानले होते.

एवढेच नाही तर औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करण्याचा प्रस्ताव ठाकरे यांच्या शेवटच्या मंत्रीमडळ बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला तेव्हा देखील काॅंग्रेसने त्याला पाठिंबा दिला, असे म्हणत चिखलीकरांनी चव्हाणांना उपरोधिक टोला लगावला होता. आज नांदेडमध्ये पुन्हा त्यांनी हेच मुद्दे उपस्थित करत अशोक चव्हाणांना थेट भाजपमध्ये येण्याची आॅफरच दिली.

चिखलीकर म्हणाले, अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी गैरहजर राहून व उस्मानाबाद,औरंगाबादच्या नामांतरास पाठींबा दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये यावे, त्यांचे स्वागतच असेल.

विश्वासदर्शक ठराव आणि नामांतराच्या विषयावर त्यांनी भाजपला अप्रत्यक्षरित्या पाठिंबाच दर्शवला होता, त्याबद्दल त्यांचे आभार मानलेच पाहिजे. ते जर भाजपात आले तर एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांचे स्वागतच करेन, असेही चिखलीकर म्हणाले. आता चव्हाण या आॅफरवर काय प्रतिक्रया देतात याकडे सगळ्याचे लक्ष असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT