Beed Corruption News  Sarkarnama
मराठवाडा

Beed Crime News: बीड जिल्ह्यात लाचखोरांनी लाज सोडली; आठ दिवसांत 8 लाचखोरांवर कारवाई

Dattatrya Deshmukh

Beed Crime News: पोलिस निरीक्षकाकडून (Inspector of Police) एक कोटी रुपये लाच मागून 30 लाख रुपयांत तडजोड प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एक कार्यकारी अभियंता, एक नगर रचनाकार व दोन खासगी अभियंत्यांवर लाचखोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. आठ दिवसांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Bribery Department) आठ लाचखोरांवर गुन्हे नोंद केले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे निलंबित व सध्या फरार असलेले पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे याने एक प्रकरणात तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागून 30 लाख रुपयांत तडजोड केली.

यातील पाच लाख रुपये स्वीकारल्यावरून खाडे सह याच विभागातील फौजदार जाधवर व एक खासगी व्यक्ती अशा तिघांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या पथकाने गुन्हा दाखल केला. यानंतर हरिभाऊ खाडे व जाधवर फरार झाले. मात्र बीडला खाडेच्या घरात तब्बल एक कोटी, 10 लाख रुपयांची रोकड, 97 तोळे सोने, साडेपाच किलो चांदी असे घबाड आढळले. तर, जाधवरच्या घरात 25 तोळे सोने आढळले. दोघांना पोलिस सेवेतून निलंबित केले असून दोघे फरार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हे प्रकरण ताजे असतानाच चकलांबा (ता. गेवराई) पोलिस (Police) ठाण्यातील मारुती केदार याला पाच हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. एकीकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाया करत असतानाच आता बुधवारी दोन कारवायांमध्ये चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. एकूणच आठवडाभरात आठ जणांवर लाच प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. यात एक पोलिस निरीक्षक, एक फौजदार, एक कार्यकारी अभियंता व एक नगररचनाकार असे बडे अधिकारी लाचेच्या कारवायांत अडकले आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (22 मे) रोजी दोन कारवायांत एका कार्यकारी अभियंत्यासह दोन खासगी अभियंत्यांना अटक केली. तर, नगर रचनाकार फरार झाला. एक कारवाई बीडमध्ये (Beed) तर दुसरी परळीत करण्यात आली आहे. आठवडाभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आठ जणांवर कारवाया केल्या. अकृषी परवान्याचा पोर्टलवर आलेल्या ऑनलाईन प्रस्तावाला मंजूरी देण्यासाठी नगर रचनाकाराचा पदभार असलेल्या प्रभारी नगर रचनाकार प्रशांत शिवाजी डोंगरे याने 30 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती 15 हजार रूपयांवर तडजोड करुन लाचेची रक्कम निलेश सोपान पवार हा अभियंत्याचा मदतनीस असून शेख नेहाल शेख अब्दुल गणी या अभियंत्याकडे देण्यास सांगीतली. या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

तक्रारदाराचे येळंबघाट शिवारातील जमिनीचा अकृषिक परवाना काढण्यासाठी ही लाच मागीतली होती. हा अर्ज बीपीएमएस पोर्टलवर निलेश पवार याच्या मार्फत दाखल केला होता. बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी पुढील कारवाईसाठी तो नगर रचना कार्यालयात पाठविला. २६ मार्च निलेश याने प्रशांत डोंगरे याच्यासाठी ३० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. ता. दोन एप्रिल रोजी याची पंचासमक्ष खात्री करण्यात आली. त्यानंतर ता. चार एप्रिल रोजी डोंगरेने देखील लाच मागितल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर तडजोडीअंती 15 हजार रूपयांची लाच शेख नेहाल याच्याकडे देण्यास सांगितली. याप्रकरणी निलेश पवार व नेहाल शेख यांना ताब्यात घेतले. तर प्रशांत डोंगरे हा फरार झाला. या तिघांविरोधातही बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे, हनुमान गोरे, संतोष राठोड, स्नेहलकुमार कोरडे, गणेश मेहेत्रे यांच्या पथकाने केली.

दुसरी कारवाई परळीत

माजलगाव पाटबंधारे विभागाच्या परळी (Parli) येथील कार्यकारी अभियंत्याने सात शेतकऱ्याकडून 28 हजार रुपयांची लाच मागितली. ती स्वीकारताना त्याला त्याच्याच कक्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या. राजेश आनंदराव सलगरकर असं संशयीत आरोपीचं नाव आहे. तक्रारदार व साक्षीदार आणि गावातील इतर पाच शेतकऱ्याचं मौजे चिंचोटी तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्याची परवानगी मिळावी, यासाठी कार्यकारी अभियंता यांच्याकडे अर्ज केला होता.

ती परवानगी देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडून 5 हजार रुपये याप्रमाणे सात जणांचे 35 हजार रुपये लाच मागितली होती. तडजोडीअंती प्रत्येकी 4 हजार रुपये याप्रमाणे 28 हजार रुपये घेण्याचे ठरले. याची तक्रार एसीबीकडे येताच त्यांनी बुधवारी खात्री केली. त्यानंतर सापळा लावला. राजेश सलगरकर याने स्वत: आपल्या कक्षातच हे 28 हजार रुपये घेतले. या वेळी त्याला लगेच बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्याविरोधात परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक युनूस शेख, सुरेश सांगळे, अविनाश गवळी, भरत गारदे, अमोल खरसाडे, अंबादास पुरी, स्नेहलकुमार कोरडे यांनी ही कारवाई केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT