Sambhaji Dahatonde - Jalna Protest News Sarkarnama
मराठवाडा

Jalna Protest News : 'लाठीचार्ज'चे आदेश देणाऱ्या जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांवर कारवाई करावी,अन्यथा...; मराठा महासंघाचा इशारा

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar : जालना जिल्ह्यातील अंतरवली (ता. अंबड) येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले होते. मुळात मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही राज्यातील सर्व समाजाची मागणी आहे. मराठा महासंघ आरक्षणासाठी आग्रही आहे. हक्काच्या मागण्यासाठी आंदोलन उपोषण कऱणे चुकीचे आहे का, असा प्रश्न मराठा महासंघाने उपस्थित करत मराठा समाजावर काठ्या चालवणे सरकारला महाग पडेल असा इशारा मराठा महासंघाचे राज्य सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील यांनी दिला आहे.

जालन्यातील पोलिसांच्या कारवाईविरोधात मराठा महासंघा(Maratha Mahasangh) कडून राज्यभर आंदोलन उभारणार असल्याचे सांगत मराठा समाजावर काठ्या चालवणाऱ्या सरकारला मराठा समाज धडा शिकवेल असा इशाराही मराठा महासंघाकडून देण्यात आला आहे.

मराठा समाजाला आरक्षण(Maratha Reservation) मिळावे यासाठी शांततेत आंदोलन, उपोषण करणाऱ्या मराठा समाजावर जालन्याच्या अंतरवली इथे बेसुमार लाठीमार करुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा मराठा महासंघाकडून निषेध करण्यात आला आहे. लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी दहातोंडे पाटील यांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मोडीत काढण्याचा पोलिसांनी गुरुवारी रात्रीच केला. उपोषण सोडण्यास नकार दिल्यानंतर बीड, जालना व औरंगाबाद जिल्ह्यातून पोलिस बोलावून अंदोलकावर लाठीमार केला. त्यात अनेक मराठातरुण आंदोलक जखमी झाले आहे. सरकारने हे जाणीवपुर्वक केले असून मराठा समाजाचे आंदोलन आणि आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे. मराठा महासंघ याविरोधात सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा संभाजीराजे दहातोंडे यांनी घटनेनंतर दिला आहे.

समाजावर काठ्या चालवूनही सरकार(State Government)ची बाजू कशी चांगली हे सांगत एकप्रकारे त्यांचे समर्थन कऱणाऱ्या सरकारमधील नेत्यांचा मराठा महासंघ धिक्कार करत आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर लाठीमार कऱण्याचे आदेश कोणी दिले याची चौकशी तर झालीच पाहीजे, मात्र या घटनेला जबाबदार धरुन जालन्याचे जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षकांवर कारवाई करावी.

यासाठी मराठा महासंघ राज्यभर आंदोलन करणार असल्याचे मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीपदादा जगताप, सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील, उपाध्यक्ष संतोष नानावटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT