Tourism Minister Aditya Thackeray
Tourism Minister Aditya Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Aditya Thackeray : दहा देशांच्या राजदुतांच्या उपस्थितीतील परिषदेला आदित्य ठाकरे गैरहजर

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आघाडी सरकारमधील नवखे, तरुण पण तितकेच तळमळीने काम करणारे मंत्री म्हणून ओळखले जातात. (Aditya Thackeray) अत्यंत कमी कालावधीत त्यांनी आपल्याकडे असलेल्या पर्यावरण व पर्यटन विभागाची जबाबदारी चांगली सांभाळल्याचे देखील बोलले जाते. (Aurangabad) राज्यात पर्यटन व्यवसाय वाढावा, जगभरातील पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात. (Marathwada)

याच प्रयत्नांचा भाग म्हणून आज राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादेत उद्योग व पर्यटन अशा दोन विषयांची एक महत्वाची परिषद आयोजित करण्यात आली होती. जगभरातील दहा देशाचे राजदुत आणि त्यांचे उच्चपदस्थ अधिकारी या परिषदेला उपस्थीत राहणार होते. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून औरंगाबादच्या आॅरिक सिटीत या परिषदेचे आयोजन करण्यात आले. स्वत: आदित्य ठाकरे या परिषदेला हजर राहण्यासाठी मुंबई विमानतळावर आले देखील. पण अचानक ते औरंगाबादकडे जाणाऱ्या विमान न बसता माघारी फिरले आणि थेट मातोश्रीवर गेले.

इकडे उद्योग मंत्री सुभाष देसाई हे सकाळीच शहरात दाखल झाले होते. परिषदेच्या तयारीचा आढावा घेत त्यांनी विदेशातून आलेल्या राजदूतांचे स्वागतही केले. पण मुख्य कार्यक्रमाला आदित्य ठाकरे हेच येणार नसल्याचे समजल्यानंतर मग उद्योग आणि पर्यटन अशा दोन्ही विभागांची धुरा देसाई यांनीच सांभाळली. आदित्य ठाकरे यांनी एवढ्या महत्वाच्या परिषदेसाठीचा दौरा ऐनवेळी रद्द का केला? याचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

आदित्य ठाकरे यांचा औरंगाबादेतील दिवसभराचा दौरा कालच जाहीर झाला होता. यात वेगवेगळ्या विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण व परिषदेला उपस्थिती असा त्यांचा भरगच्च कार्यक्रम होता. औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रासह डीएमआयसीमध्ये विदेशी गुंतवणूक वाढावी, यासाठी आज ऑरिक हॉलमध्ये विदेशी गुंतवणूक आणि पर्यटनावर 'ऑरा ऑफ ऑरिक परिषद' आयोजित करण्यात आली होती.

यासाठी बाहेरच्या सात देशातून त्यांचे राजदूत देखील शहरात दाखल झाले होते. दुपारी आदित्य ठाकरे हे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, त्यासाठी ते मुंबई विमानतळावर देखील आले, पण अचानक हा दौरा रद्द झाला आणि ते परत मातोश्रीवर परतले. नियोजित दौऱ्यानूसारआदित्य ठाकरे दुपारी १ वाजता चिकलठाणा विमानतळावर आणि तेथून दीड वाजता ऑरिक सिटी येथील आयुर्वेद उत्पादन निर्मिती प्रकल्पास भेट देऊन पाहणी करणार होते.

त्यांनतर अडीच वाजता ते शहर पाणीपुरवठा योजनेची पाहणी करणार होते. तर दुपारी ३ वाजता ते वेरुळ येथे जाऊन लेणी परिसरात पर्यटकांना पुरवल्या जाणाऱ्या सोयीसुविधांची पाहणी करून सायंकाळी पुन्हा मुंबईला परतणार होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT