Marathwada drought news : महाराष्ट्रातील अनेक भागांत निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे यांचा दोन दिवसांचा दौरा २६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
या दौऱ्यात आठ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महाराष्ट्रात भीषण दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना मदत मिळण्याची गरज निर्माण झाली आहे. दुसरीकडे, महायुती सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचाली सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आणि त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे हे थेट शेताच्या बांधावर जाणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यात सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यात येणार आहे.
केवळ प्रशासकीय पातळीवरील माहितीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्यावर दौऱ्यात भर राहणार असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती सरकारमधील अनेक मंत्री मराठवाडा व राज्यातील विविध भागात दुष्काळी पाहणीच्या दौऱ्यावर होते.
तर इकडे मुंबईत उद्धव ठाकरे हे या दौऱ्यावर व राज्य सरकारच्या मुहूर्त पाहून मदत जाहीर करण्याच्या धोरणावर टीका करत होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात अध्यादेश जारी करण्याची तयारी सुरू असतानाच आदित्य ठाकरे यांचा मराठवाड्यातील दुष्काळी पाहणी दौरा होत आहे.
मात्र, दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे यांच्याकडून कोणत्या मागण्या मांडल्या जातात, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी कोणत्या उपाययोजनांची मागणी केली जाते आणि शासनाच्या दुष्काळविषयक निर्णयावर त्यांची नेमकी भूमिका काय राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
२६ सप्टेंबर बोरामणी (दक्षिण सोलापूर), खानापूर (धाराशिव), तावरशी ताळ (लातूर), गाऊंड (नांदेड), माळवटा शिवार (हिंगोली)
२७ सप्टेंबर टाकळी कुंभकर्ण (परभणी), वरफळ व रामनगर साखर कारखाना (जालना), भगतवाडी (छत्रपती संभाजीनगर)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.