Santosh Danve
Santosh Danve Sarkarnama
मराठवाडा

शिवरायांच्या पुतळ्याच्या एलईडीसाठी पैसे मागणाऱ्या कार्यकर्त्यांना दानवेंच्या आमदारपुत्राचे अवमानकारक उत्तर... व्हिडिओ व्हायरल...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या विधानावरून राज्यातील भाजप नेते (BJP Leader) चांगलेच अडचणीत आले आहेत. असे असताना भाजपचा आणखी एक नेता गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे सुपुत्र आणि आमदार संतोष दानवे (Santosh Danve) यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ (Video) सोशल मीडियात चांगलाच धूमाकूळ घालत आहे. ‘शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला एलईडी दिवे लावायले पैसे दिले तर कपडे विकायला लागतील मला माझे,’ असे विधान त्यांनी केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे यांच्यापाठोपाठ त्यांचे चिरंजीवही वादात सापडणार हे नक्की. (After Raosaheb Danve, his MLA son's controversial video goes viral)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही तरुण आमदार संतोष दानवे यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी एलईडी दिवे बसविण्यासाठी पैसे मागताना दिसत आहेत. त्या तरुणांनी दानवे यांच्याकडे पैशाची मागणी केल्यानंतर त्यांनी कशाचे एलईडी लाईट अशी विचारणा केली. त्यावेळी त्या तरुणांनी हे एलईडी दिवे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी लावण्यात येणार असल्याचे सांंगितले. त्यावर आमदार दानवे यांनी ‘अरे असे एलईडी लाईट दिले तर कपडे विकायला लागतील मला माझे’ असे उत्तर दिले.

त्यानंतरही त्या तरुणांनी आपली चिकाटी सोडली नाही. आम्ही लांबून आलो आहोत, असे दानवे यांचा सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर आमदार दानवे म्हणाले की, ‘लांबून आले. पण असे पैसे थोडी वाटत फिरणार आहे मी. ’ तुमच्याकडे स्थानिक नेते कोण आहेत, त्यांच्याकडे जा. मी सांगतो त्यांना, असे सांगितले. त्यावर तरुणांनी शांत न राहता, ‘तुम्ही त्यांना कशाला सांगताय. तुम्ही पैसे द्या ना,’ असा आग्रह धरला. त्यावर नाही नाही मी असे पैसे वाटत नसल्याचे सांगून एलईडी दिवे देण्यास आमदार दानवे यांनी नकार दिला.

दानवे यांच्या नकारानंतरही त्या तरुणांनी आपला हेका सोडला नाही. तुम्ही पावती फाडा नुसती, असा आग्रह त्यांनी धरला. त्यावर आमदार संतोष दानवे यांनी ‘चल निघ रे’ असे सांगून त्यांना बाहेर काढण्यास सांगितले. संतोष दानवे यांचा हा आठ वर्षांपूर्वीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, आमदार प्रसाद लाड, त्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक विधाने केली होती. तत्पूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही तर वाद्‌ग्रस्त विधानांची मालिकाच लावली आहे. त्यात आता रावसाहेब दानवे यांच्या आमदार मुलाची भर पडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT