Dhananvjay Munde News :  Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde On Farmers : मोदींच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी कृषिमंत्री मुंडेंनी कंबर कसली..

Farmers News : महाराष्ट्रातील ९७ लाख पात्र शेतकऱ्यांपैकी ८५ लाख शेतकऱ्यांनाच प्रत्यक्षात लाभ मिळाला.

सरकारनामा ब्युरो

Mharashtra News : विरोधी पक्षात असतांना ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकऱ्यांसाठीच्या योजनावर धनंजय मुंडे व त्यांचे इतर सहकारी आगपाखड करत होते, तेच धनंजय मुंडे आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कृषिमंत्री आहेत. (Dhananjay Munde On Farmers) आधी विरोधकांच्या भूमिकेत असलेल्या धनंजय मुंडेंची आता सत्ताधारी म्हणून भूमिका बदलली आहे. कृषिमंत्री म्हणून राज्यातील बारा लाख शेतकऱ्यांना पंतप्रधानमंत्री किसान सन्मान व नमो किसान सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे मोदींच्या योजनांसाठी मुंडे कामाला लागले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हफ्त्यापासून राज्यातील १२ लाख पात्र (Farmers) शेतकरी भूमी अभिलेख अद्ययावत नसणे, ई - केवायसी नसणे तसेच बँक खात्याशी आधार संलग्न नसणे या कारणांनी दुर्लक्षित राहिले होते. मात्र यापुढे या दोन्ही योजनांना राज्यातील पात्र शेतकरी मुकू नयेत याचा विचार करून या तीनही प्रकारच्या नोंदण्या व अटींची पूर्तता एकत्रित व गतिमान पद्धतीने पूर्ण करण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी १५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम हाती घेतली आहे.

या मोहिमेंतर्गत प्रत्येक तालुका स्तरावर तहसीलदार, तालुक्याचे भूमिअभिलेख अधिकारी व तालुका कृषी अधिकारी या तिघांची संनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. त्यांच्या देखरेखीखाली गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी व कृषी सेवक यांनी वरील तीन अटींमुळे लाभापासून वंचित राहिलेले शेतकरी शोधून त्यांच्यामार्फत तीनही अटींची पूर्तता करण्यात येईल, अशा स्वरूपात ही मोहीम १५ ऑगस्टपर्यंत राबविण्यात येणार आहे. (PM Modi) प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे नुकतेच वितरण झाले असून महाराष्ट्रातील ९७ लाख पात्र शेतकऱ्यांपैकी ८५ लाख शेतकऱ्यांनाच प्रत्यक्षात लाभ मिळाला.

१२ लाख शेतकरी पात्र असूनही भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत नसणे, ई-केवायसी नसणे तसेच बँक खात्याशी आधार संलग्न नसणे, या तीन कारणांनी वंचित राहिले. आता राज्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या नमो किसान सन्मान योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यापूर्वी केंद्राच्या योजनेतून वंचित राहिलेल्या १२ लाख शेतकऱ्यांच्या सर्व अटींची पूर्तता करण्याचे काम कृषी विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेऊन हाती घेतले आहे. याबाबत मुंडे यांनी कृषी विभागाच्या सचिवांना एक पत्र देऊन आवश्यक सूचना केल्या आहेत, त्याप्रमाणे कार्यवाही केली जात आहे.

सदर मोहीम यशस्वी झाल्यास राज्यातील या १२ लाख शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ व राज्याच्या नमो किसान सन्मान योजनेचा असा दुहेरी लाभ मिळणार आहे. ही मोहीम शंभर टक्के यशस्वी होऊन राज्यातील एकही पात्र शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व नमो किसान सन्मान योजनेपासून वंचित राहू नयेत यासाठी प्रयत्न करत असल्याचे मुंडे यांनी सांगितले. तसेच जे पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत त्यांनी संनियंत्रण समितीशी संपर्क करून आपले केवायसी व अन्य अटींची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT