NCP-BJP Politics : राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अहमदपूर शहरातील नगरपालिका निवडणुकीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गद्दारीचा भाजपकडून झालेला आरोप, बदला घेण्याची भाषा, त्याला विधानसभेला कोणी गद्दारी केली? असा पलटवार करत सहकार मंत्र्यांनी दिलेला आव्हान यामुळे अहमदपूरची निवडणुक चांगलीच गाजली. काल झालेल्या मतदानानंतर मतदारांमध्ये उत्साह असल्याचे दिसून आले. वाढलेला मतदानाचा टक्का नेमका कोणाचा बदला घेतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
लातूर जिल्ह्यातील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन नेत्यांमधील संघर्ष अहमदपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत उफाळून आल्याचे दिसून आले होते. निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सहकार मंत्र्यांनी धोक्या दिल्याचा आरोप करत निवडणुकीत बदला घेण्याची टोकाची भाषा केली.
यावर मंत्री बाबासाहेब पाटील यांनीही गद्दारी आम्ही केली नाही, विधानसभेला गद्दारी कोणी केली होती? हे तपासा म्हणत जशासतसे उत्तर दिले. या सगळ्याचा मतदारांवर काय परिणाम झाला? हे 21 तारखेच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
मंगळवारी मतदान पार पडल्यानंतर त्याची टक्केवारी समोर आणि मतदारांमध्ये उत्साह होता हे दिसून आले. अहमदपूरमध्ये 73.6 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सरासरी पाच टक्के अधिक मतदान झाले असून हा वाढलेला टक्काच सत्ता कोणाची? हे ठरवणार आहे.
अहमदपूर नगर परिषदेसाठी 14292 पुरुष तर 13292 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. शहरातील 44 केंद्रावर एकूण 27 हजार 540 मतदान झाले असून, सर्वाधिक 84.98 टक्के मतदान प्रभाग 4 मधील लोकराजा विद्यालयातील केंद्रावर झाले. तर सर्वात कमी मतदान प्रभाग क्रमांक दोनमधील जिल्हा परिषद शाळेत झाले आहे.
2016 च्या निवडणुकीत 68 टक्के मतदान झाले होते तर यावर्षी मतदान 4.93 टक्क्यांनी वाढले आहे. 2016 मध्ये अपक्ष, भाजप व राष्ट्रवादी (NCP) यांच्यात लढत झाली होती. अश्विनी कासनाळे यांना 6436 मते, रजनी रेड्डी यांना 6062 तर कल्पना रेड्डी यांना 1358, शेख खाजा बेगम 2227, शेख शहनाजबीन यांना 4262 मते मिळाली होती. अपक्ष अश्विनी कासनाळे 368 मतांनी नगराध्यक्ष झाल्या होत्या.
यावेळी नगराध्यक्षपदासाठी सात उमेदवार रिंगणात असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभय मिरकले, भारतीय जनता पक्षाकडून (BJP) ॲड. स्वप्निल व्हते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शेख कलीमोद्दीन अहमद, वंचित बहुजन आघाडीचे सय्यद साजिद कबीर तर बहुजन समाज पार्टीकडून रमेश गायकवाड हे आपले नशीब आजमावत आहेत. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री विनायकराव पाटील व भाजपचे गणेश हाके यांच्यात रंगलेला कलगीतुरा निवडणुक प्रचारात चर्चेचा विषय ठरला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.