Chhatrapati Sambahajinagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सभागृहात सातत्याने एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांमध्ये आता दालनावरून राजकारण सुरू झाले आहे. वंचित आघाडीचे गटनेते अफसर खान यांच्या दालनावर झालेल्या कोटीभराच्या खर्चाचा मुद्दा उपस्थित करत एमआयएमने संधी साधली आहे.
अफसर खान यांना दिलेल्या दालनावर कोटीचा खर्च करण्यात आल्याचा आरोप करत जनतेने कर रूपाने भरलेल्या पैशांची अशा प्रकारे उधळपट्टी केली कशाला? असा सूर एमआयएमने लावला आहे. एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांनी बुधवारी महापौर समीर राजूरकर, आयुक्त अमोल येडगे यांच्या दालनात जाऊन संताप व्यक्त केला.
महापालिकेत दालनांवरून काही महिन्यांपासून धुसफूस सुरू आहे. शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच वंचित बहुजन आघाडी व विरोधीपक्ष असलेल्या एमआयएम पक्षाने गटनेत्यांना दालन मिळावे, अशी मागणी महापौरांकडे लावून धरली होती. महापौर त्यांना वारंवार आश्वासन देत होते
असे असतानाच वंचित बहुजन आघाडीचे गटनेते अफसर खान यांना प्रशासनाने दालन दिले. आता या दलानाच्या उद्घाटनापूर्वीच वाद पेटला आहे. एमआयएम पक्षाचे नगरसेवक बुधवारी दुपारी विरोधी पक्षनेता समीर बिल्डर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत घोषणाबाजी करत दाखल झाले. थोड्या वेळाने आयुक्त अमोल येडगे मुख्यालयात आले व त्यांच्या दालनाकडे सर्व नगरसेवक धावले.
सुरक्षारक्षकांनी मात्र त्यांना रोखल्याने नगरसेवकांनी महापौर, आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गोंधळ पाहून आयुक्तांनी फक्त नगरसेवकांना दालनात पाठविण्याची सूचना केली. पण शिष्टमंडळात कार्यकर्ते, नगरसेवक पती असल्याने त्यांना रोखण्यात आले, यावेळी रेटारेटी करून तेही दालनात घुसले. समीर बिल्डर आयुक्तांसोबत बोलताना म्हणाले, पाच नगरसेवक असलेल्या पक्षाला सुमारे २ हजार स्केअर फूट एवढे मोठे दालन दिले गेले.
किमान एक कोटी रुपयांचा खर्च त्यावर झाला. जनतेने कर रूपाने भरलेल्या पैशांची अशा पद्धतीने उधळपट्टी आम्ही सहन करणार नाही. महापालिकेत आमचे ३६ नगरसेवक आहेत, अद्याप पक्षाच्या गटनेत्याला दालन का दिले नाही? असा प्रश्न करत तुम्ही मनमानी करत आहात. मंत्री अतुल सावे यांच्या सांगण्यानुसार हे दालन देण्यात आले आहे, तुम्ही भाजपचे आयुक्त आहात, असा आरोप समीर बिल्डर यांनी केला.
त्यावर आयुक्तांनी कोणत्या पक्षाचे नाव घेण्याची गरज नाही, तुमच्या मागण्या काय आहेत? त्या सांगा अशी सूचना केली. एमआयएम पक्षाच्या एका एका नगरसेवकांनी वॉर्डातील विकास कामे होत नाहीत, नागरिकांनी आम्हाला निवडून दिले, आमची कामे अधिकारी ऐकत नाहीत? अशा तक्रारी केल्या. आयुक्तांनी त्याला उत्तरे देत काही कामे पाइपलाइनमध्ये आहेत तर उर्वरित कामे प्राधान्याने केली जातील, असे आश्वासन दिले. त्यानंतर हे शिष्टमंडळ महापौरांच्या दालनात पोचले.
महापौर समीर राजूरकर यांच्या दालनात एमआयएम पक्षाच्या बाबतीत पक्षपातीपणाची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप बिल्डर यांनी केला. त्यावर महापौरांनी सर्वच गटनेत्यांच्या दालनासंदर्भात प्रशासनाला पत्र दिलेले आहेत. कोणाला किती आकाराचे दालन द्यायचे याची नियमावली नाही. एमआयएम पक्षाच्या गटनेत्याला देखील दालन दिले जाईल, असे आश्वासन दिले. त्यावर बिल्डर यांनी वंचितच्या दालनाचा वापर पत्ते खेळण्यासाठी होणार का? असे हातवारे करत अफसर खान यांना डीवचले.
नगरसेवकांच्या संख्येवरून नाही तर महापालिकेतील प्रत्येक पक्षाच्या गटनेत्याला दालन दिले जाते, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीच्या गटनेत्याला दालन मिळाले आहे. दालनांवर होणाऱ्या खर्चाविषयी एमआयएम पक्षाला आक्षेप असेल तर महापौरांनी त्यांना दालन देऊन नये, त्यामुळे खर्चाची बचत होईल, असा टोला, वंचितचे गटनेते अफसर खान यांनी एमआयएमला लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.