Imtiaz Jaleel News : महायुती-महाविकास आघाडीचे चर्चेचे गु्ऱ्हाळ सुरू असतानाच एमआयएमने मात्र छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत बाजी मारली आहे. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी शहरातील काही प्रभागांमधील एकूण आठ जणांच्या नावांची घोषणा केली आहे. या शिवाय जालन्यातील एक तर नाशिकमधील तीन उमेदवारांचीही घोषणा इम्तियाज यांनी आपल्या सोशल मिडिया पेजवरून केली आहे. एमआयएमने स्वबळावर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
गेल्या महापालिकेत 26 नगरसेवकांसह एमआयएम विरोधी पक्षाच्या भूमिकेत होते. आता ही संख्या तीस ते पस्तीस पर्यंत नेण्याचा आपला प्रयत्न असल्याचे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. चारशेहून अधिक इच्छुकांच्या मुलाखती, एका एका प्रभागात सात ते आठ इच्छुक असल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण असल्याचा दावा त्यांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी महापालिकेत आम्ही जोरदार मुसंडी घेऊ, असा विश्वासही इम्तियाज यांनी व्यक्त केला.
नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षाचे 83 नगरसेवक तर कारंजा येथे एक नगराध्यक्ष निवडून आला आहे. या जोरावर सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्षाने पहिली आठ जणांची यादी जाहीर केली आहे. तर शहरातील मनपा निवडणुकीसाठी जवळपास चारशेहून अधिक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. यामध्ये मुस्लिम उमेदवारांसह, अनुसूचित जाती, मराठा व हिंदू उमेदवारांनीही मुलाखती दिल्याचे कळते.
महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप, दोन्ही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी तसेच एमआयएम पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. एमआयएमकडून गेल्या चार दिवसांत जवळपास चारशे इच्छुकांनी मुलाखती दिल्या. काही प्रभागांमध्ये आमच्याकडे पन्नास ते साठ इच्छुक असल्याचा दावा पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे.
या अगोदर एमआयएम पक्षाने वंचित बहुजन आघाडी सोबत युती करत मोठे यश मिळवले होते. परंतु काही कारणास्तव या दोघांनी काडीमोड घेतली. त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये एमआयएमने एकला चलो रे ची भूमिका घेत निवडणूक लढली. यात त्यांना अपयश आले, परंतु पक्षाच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये वाढ झाली होती. आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्यातरी एका पक्षाशी युती होणार असे चित्र आहे. सध्या मायावतींची बहुजन समाज पार्टी, ॲड. सुरेश माने यांच्या बीआरएसपी पक्षाशी प्राथमिक स्तरावर बोलणी झाल्याचे बोलले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.