Imtiaz Jaleel Saffron Kurta Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel Saffron Kurta : 10 वर्षांनंतर इम्तियाज जलील मराठवाडा मुक्ती दिनाला; भगवा कुर्ता चर्चेत

AIMIM chief Imtiaz Jaleel attended the Marathwada Liberation Day event in a saffron kurta, drawing political attention : आमदार-खासदार असताना गैरहजेरीवरून टीका; यंदा हुतात्मा स्मारकाला अभिवादन करत जलील म्हणाले, ‘हिरवा घातला तर हिरवा साप म्हणतात, म्हणून भगवा घातला’

Jagdish Pansare

Marathwada Liberation Day : AIMIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे आमदार, खासदार असताना कधी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अभिवादन कार्यक्रमाला सहसा हजर राहिले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीवरून ते टिकेचे धनीही ठरले.

परंतु 2024 च्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा अशा सलग दोन्हीही निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता कुठे ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अभिवादन कार्यक्रमाला हजर राहू लागले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत काल झालेल्या शासकीय ध्वजवंदन आणि हुतात्मा स्मारकाच्या अभिवादन कार्यक्रमात इम्तियाज जलील हे चक्क भगवा कुर्ता घालून सहभागी झाले होते. आपल्या या भगव्या कुर्त्याकडे सगळ्यांचे लक्ष जाणार, त्याची चर्चा होणार हे इम्तियाज चांगलेच ओळखून होते. मुख्य कार्यक्रम सुरू होण्याआधी सर्वपक्षीय नेते व उपस्थित पदाधिकाऱ्यांशी हस्तांदोलन करत सर्वांचे लक्ष आपल्या भगव्या कुर्त्याकडे जावे याची पुरेपूर काळजी ते घेताना दिसले.

कार्यक्रमाला हजेरी, हुतात्मा स्मारकाला अभिवादन आणि त्यासाठी खास भगव्या कृत्याची निवड यातून इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचे काम केल्याची चर्चा आता होत आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अभिवादन कार्यक्रमाला सातत्याने गैरहजर राहिलेल्या इम्तियाज जलील यांच्यावर विशेषतः शिवसेनेकडून कायम हल्लाबोल केला जातो.

हिरवा साप म्हणत त्यांच्यावर टीका केली जाते. यावेळी मात्र इम्तियाज जलील यांनी विरोधकांना तशी संधीच मिळू दिली नाही. ते सिद्धार्थ उद्यानातील मराठवाडा मुक्ती संग्राम हुतात्मा स्मारकाच्या अभिवादनाला हजर राहिले, ते ही भगवा कुर्ता घालून. यासंदर्भात माध्यमाने जेव्हा इम्तियाज जलील यांना छेडले, तेव्हा मी हिरवा कुर्ता घातला तर मला हिरवा साप म्हटले जाते, म्हणून मी आज भगवा कुर्ता घालून आलो आहे, असा टोला विरोधकांना लगावला. छत्रपती संभाजी नगर महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमचे नगरसेवक आपल्या पक्षाची ताकद दाखवण्यासाठी शेरवानी आणि हिरवे फेटे घालून सभागृहात येत असतात.

मात्र काल त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी भगवा कुर्ता घालत आपल्यावर होणाऱ्या टीकेला चोख प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला. महापालिकेच्या राजकारणात एमआयएम आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जेव्हा संघर्षाचा भडका उडतो तेव्हा एमआयएमच्या नगरसेवकांचा संबंध रझाकार आणि हैदराबादच्या निजामाशी जोडला जातो.

यावर आमचा निजामाशी संबंध नाही, असे इम्तियाज जलील यांनी वारंवार स्पष्टीकरणही दिले. परंतु संधी मिळेल तेव्हा शिवसेना भाजप हे सत्ताधारी पक्ष एमआयएमवर याच मुद्द्यावरून तुटून पडतात. या सगळ्या टीकाकारांना काल इम्तियाज जलील यांनी भगवा कुर्ता घालून उत्तर दिल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT