Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर बसल्यानंतर आता खऱ्या अर्थाने कामाला सुरूवात झाली आहे. सत्ताधारी पक्षानंतर सर्वाधिक 33 नगरसेवक निवडून आणत विरोधी पक्ष ठरलेल्या एमआयएमने विरोधी पक्षनेते पदासाठीचे नाव अंतिम केले असून अब्दुल समीर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. या संदर्भात एक पत्र पक्षाच्या वतीने महापौर समीर राजूरकर यांच्याकडे देण्यात आले आहे.
भाजपाने 57 नगरसेवक निवडून आणत बहुमताला गवसणी घातली. युती धर्म म्हणून शिवसेनेला सोबत घेत उपमहापौर पद दिले. महापौर समीर राजूरकर आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांची जोडी संभाजीनगर महापालिकेचा कारभार चालवण्यासाठी तसेच विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमला रोखण्यासाठी योग्य असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटल्या होत्या.
एमआयएमचे 33 नगरसेवक निवडून आल्यामुळे सत्ताधारी शिवसेना-भाजप पक्षाला सभागृह चालवताना किंवा बहुमताच्या जोरावर निर्णय घेताना या पक्षाचा कडाडून विरोध होणार हे स्पष्टच आहे. विशेष म्हणजे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मोठा विरोध पत्करत महापालिकेत गेल्यावेळच्या 22 माजी नगरसेवकांची उमेदवारी कापत नव्या व तरुण चेहऱ्यांना संधी दिली होती. त्यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये तरुणांची संख्या अधिक असणार आहे.
त्यामुळे सभागृहात सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असा संघर्ष पुढील पाच वर्ष पहायला मिळणार आहे. या नगरसेवकांना अर्थात इम्तियाज जलील यांचे मार्गदर्शन असणार आहे. त्यामुळे एमआयएमच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात एमआयएम सत्ताधारी शिवसेना-भाजपला घाम फोडणार यात शंका नाही. शहरातील देशी दारूची दुकाने शहराबाहेर हलवण्याची प्रमुख मागणी एमआयएमकडून येणाऱ्या काही दिवसात सभागृहात केली जाऊ शकते. यावरूनच पहिला भडका सत्ताधारी विरुद्ध एमआयएम यांच्यात उडू शकतो.
'एमआयएम'च्या 32 नगरसेवकांनी काल विरोधी पक्षनेतेपदासाठी अब्दुल समीर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांसह निवडीचे अधिकृत पत्र महापौर समीर राजूरकर यांना सुपूर्द करण्यात आले. आहे. महापौर राजूरकर यांनी या पत्राची दखल घेत प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी सर्व 32 नगरसेवकांना पत्रावर समक्ष स्वाक्षऱ्या करण्याची सूचना केली आहे.
या स्वाक्षऱ्यांच्या तांत्रिक तपासणीसाठी हे पत्र नगर सचिव विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. नगर सचिव विभागाचा अधिकृत अहवाल प्राप्त होताच, महापौर कार्यालयाकडून अब्दुल समीर यांना विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात येणार असल्याचे समजते. अब्दुल समीर हे इम्तियाज जलील यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे येत्या काळात भाजपविरुद्ध एमआयएम असा संघर्ष बघायला मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.