Aimim-Shivsena Contorvercy News : महापालिका निवडणुकीत माघारीनंतर आता चित्र स्पष्ट झाले आहे. आता पुढचे 10 दिवस छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचाराचा धुराळा उडणार आहे. राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि टीका सुरू केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज एमआयएमवर टीका करतांना थेट असदुद्दीन ओवेसी यांच्या वडीलांचाच उल्लेख केला.
सुरवातीपासूनच एमआयएम हा पक्ष आणि त्यांचे नेते तोडपाणी आणि दलालीच करत आल्याचा आरोप शिरसाट यांनी केला होता. यावर भडकलेल्या इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांना जे खोक्यांवर विकले गेले आहेत, त्यांनी आम्हाला नितिमत्ता शिकवू नये, अशा शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. पदाचा गैरवापर करून गरिबांच्या जमीनी हडपणे, एमआयडीसीतील भुखंड गिळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आमच्यावर बोट दाखवण्याचा अधिकार नाही, असेही इम्तियाज जलील म्हणाले.
एमआयएम पक्षात सध्या उमेदवारीवरून बरेच वादंग सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील व त्यांच्या मुलाने बसून उमेदवार ठरवले आणि त्यावर ओवेसींची मोहर उठवली, असा आरोप पक्षाचे दुसरे स्थानिक नेते नासेर सिद्दीकी यांनी केला होता. पक्षात इम्तियाज जलील यांच्याविरोधात एक गट, तर नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याबद्दल ज्यांना उमेदवारी मिळाली तो दुसरा गट असे चित्र आहे. अशातच इम्तियाज जलील आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यातील संघर्षाचा दुसरा अंक महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झाला आहे.
संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका जाहीर कार्यक्रमात तरुणीचा बुरखा खाली केल्याच्या घटनेचा एमआयएमकडून निवडणूक प्रचारात मुद्दा केला जाणार असल्याकडे लक्ष वेधले. आमच्या मुलींचे बुरखे उतरवले जात आहेत, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केला होता. यावर संजय शिरसाट यांनी कोणी कोणाचे बुरखे उतरवत नाही, इम्तियाज जलील आणि त्यांचा पक्ष हा दलालांचा पक्ष आहे. एका मौलानाच्या विधानाचा दाखला देत बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा असदुद्दीन ओवेसी यांचे वडील लोकसभेत तावातावाने बोलत होते.
पण नंतर त्यांनी हैदराबादेत रुग्णालय, काँलेज मंजुर करून घेतले, असा दावा केला. संजय शिरसाट यांनी थेट ओवेसी यांच्या वडीलांचा उल्लेख करत टीका केल्याने इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांना प्रत्युत्तर देतांना त्यांच्यावरील आरोपांचा पुनरुच्चार केला. जेव्हा एखादा मुख्यमंत्री लहान मुलीचा बुरखा स्वतःच्या हाताने काढतो. तेव्हा ती निंदनीय गोष्ट असते. जर कोणी म्हणत असेल की त्यांचा हात इकडे तिकडे गेला असता तर काय झाले असते? तर अशांचे हात तोडून त्यांच्याच हातात देण्याची ताकद आमच्यात आहे. ती मुलगी कोणत्याही जाती-धर्माची असो आमची भूमिका हीच राहिली असती, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला.
राज्यात 65 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याच्या मुद्द्यावर इम्तियाज यांनी ही घटना म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले आहे. भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे यांच्यावर प्रशासकीय गुंडगिरीचा आरोप करतांनाच उमेदवारांना उचलून नेणे, त्यांच्यावर दबाव टाकून अर्ज मागे घ्यायला लावणे हे लोकशाहीला घातक आहे. पक्षांतर्गत वाद आणि बंडखोरीवर ते एमआयएमचेच (AIMIM) म्हणजे आमचेच समर्थक आहेत. जर माझ्यावर कोणाची नाराजी असेल तर त्याचा फटका पक्षाला देऊ नका, असे आवाहनही इम्तियाज जलील यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.