

Chhatrapati Sambhajinagar News : शिवसेना-राष्ट्रवादीतील फुटीनंतर मोठ्या प्रमाणात इनकमिंग-आऊटगोईंग झाले. नगरपालिका, नगरपचंयात आणि आता महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची पक्षांतरे झाली. पक्ष वेगळे असले तरी दोन्हीकडे चेहरे मात्र तेच ते दिसत आहेत. भाजप-शिवसेना या दोन पक्षांनी सर्वाधिक माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कधीकाळी सोबत काम केलेले अनेक इच्छुक उमेदवार हे एकमेकांच्या समोर उभे आहेत.
महापालिका निवडणुकीची तयारी सुरू होताच सर्वच पक्षांत 'इनकमिंग-आऊट गोइंग' चे पेव फुटले. ज्या प्रभागात आपली ताकद नाही तिथे राजकीय पक्षांनी ठरवून अनेकांना प्रवेश दिला. त्यात माजी महापौरांसह माजी नगरसेवकांना तिकिटाचा शब्द दिला गेला. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक माजी नगरसेवकांचा समावेश आहे. भाजपने तब्बल 30 तर त्यापाठोपाठ शिंदे सेनेने 16 माजी नगरसेवकांना संधी दिली.
यातील अनेकांनी महापालिकेत महत्त्वाची पदे उपभोगलेली आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 9 जणांना पुन्हा संधी दिली आहे. एमआयएम पक्ष अपवाद ठरला असून, त्यांच्या यादीत केवळ चार माजी नगरसेवकांचा समावेश आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसकडे बोटावर मोजण्याएवढे माजी नगरसेवक आहेत. नगरसेवक पद ही राजकारणातील पहिली पायरी मानली जाते. महापालिकेत विविध पदांवर काम करणारे अनेक जण पुढे आमदार, खासदार झाले.
पुढे राज्याच्या राजकारणात यातील अनेकांनी दबदबाही निर्माण केला, असे असताना अनेक मातब्बरांना महापालिकेच्या मोहातून बाहेर पडता आले नाही. सर्वोच्च पदे मिळाल्यानंतरही, चार-पाच वेळा नगरसेवक राहूनही पुन्हा महापालिकेत येण्याचा त्यांना मोह आहे. यंदाच्या निवडणुकीतही अशा उमेदवारांचा मोठा भरणा आहे. गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेची निवडणूक झालेली नसल्याने अनेक जण सेल्फ आउट होतील, अशी नव्या फळीतील पदाधिकाऱ्यांना अपेक्षा होती.
पण निवडणुका जाहीर होताच अशा मातब्बर उमेदवारांनी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारल्या. त्यात राज्यातील सत्ताधारी भाजप व शिवसेनेत सर्वाधिक प्रवेश झाले. या दोन्ही पक्षांनी जाहीर केलेल्या याद्यांमध्ये तेच ते उमेदवार दिसून येत आहेत. भाजपने तब्बल 96 पैकी 30 माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे, तर माजी नगरसेवकांचे नातलग असलेल्या 9 जणांचा देखील यात समावेश आहे.
शिंदे सेनेने 100 पैकी 16 माजी नगरसेवकांना तर 7 माजी नगरसेवकांच्या नातलगांना उमेदवारी दिली आहे. ठाकरे सेनेने 99 पैकी 9 माजी नगरसेवकांना तर 10 नातलगांना उमेदवारी दिली आहे. त्यात कोणाची पत्नी तर कोणाची मुलगी तर कोणाचा मुलगा, सुनेचाही समावेश आहे.
एमआयएम पक्षाच्या उमेदवारीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असले तरी या पक्षाने केवळ चार माजी नगरसेवकांना उमेदवारी, तर उर्वरित नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली आहे. तब्बल 22 माजी नगसेवकांचा पत्ता कट करण्यात आल्याने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.