AIMIM leader Asaduddin Owaisi. addressing party workers in Chhatrapati Sambhajinagar  Sarkarnama
मराठवाडा

AIMIM On SIR : देशभरात 'SIR' विरोधात विरोधक आक्रमक पण MIM शांत! टीका सुरु झाल्यानंतर ओवैसींचा आला आदेश, भाजपच्या 19000 आक्षेंपाना केले चॅलेंज

AIMIM challenges BJP’s 19,000 voter-list objections in Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात भाजपने दाखल केलेल्या १९ हजार मतदार यादीतील आक्षेपांवरून एमआयएमने आक्षेप घेत निवडणूक विभागाकडे तक्रार केली. या प्रकरणामुळे राजकीय तणाव वाढला असून चौकशीची मागणी होत आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News: सध्या विरोधीपक्षातील नेत्यांनी मतदार यादीतील नावे वगळल्यावरुन आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. विरोधीपक्ष निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे. यातच एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन गेले. यावेळी त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी एमआयएमच्या नगरसेवकांची एक बैठक घेतली होती. ही बैठक गोपनीय असल्याचे सांगत त्यांनी बैठकीत नेमकी चर्चा काय झाली? हे सांगण्यास नकार दिला होता.

दरम्यान, देशात राबवल्या जात असलेल्या एसआयआरच्या माध्यमातून मुस्लिम मतदारांची नावे वगळण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला होता. एसआयआरच्या बाबतीत सतर्क राहा, असा कानमंत्र त्यांनी आपल्या सर्व नगरसवेक आणि पदाधिकाऱ्यांना दिला होता. त्यानंतर एमआयएम या मुद्यावरून आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.

छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात भाजपाने दाखल केलेल्या १९ हजार दुबार नावांच्या आक्षेपावरून काल भाजप आणि एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला. भाजपाने हे आक्षेप आपण पुराव्यासह नोंदवल्याचा दावा केला, तर दुसरीकडे एमआयएमने बीएलओंनी भाजपाच्या लोकांशी हातमिळवणी केल्याचा आरोप करत दाखल करण्यात आलेले आक्षेप बेकायदेशीर असल्याची तक्रार निवडणूक विभागाकडे केली.

यावरून सोशल मिडियावर अनेक अफवा पसरल्या आणि नारेगाव, किराडपुरा भागातील मनपाच्या केंद्रावर मोठा जमाव जमला. बीएलओंना एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी केल्यामुळे त्यांनी कामकाज थांबवले. अखेर पोलीसांनी मध्यस्थी केल्यानंतर तणाव निवळला. आक्षेप नोंदवण्याच्या मुदतीच्या शेवटच्या दिवशी भाजपाने १९ हजार आक्षेप दाखल केले. एकाच मतदाराचे नाव दोन ठिकाणी असल्याचे पुरावे आक्षेपासोबत जोडल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला.

त्यानंतर एमआयएमच्या शिष्टमंडळाने निवडणूक उपजिल्हाधिकारी सविता चौधरी यांची भेट घेत तक्रार दिली. भाजपाच्या बीएलओंशी हातमिळवणी करून आक्षेपांचे गठ्ठे स्वीकारल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला. यातून गोंधळ वाढला आणि एमआयएमच्या काही नेत्यांनी नारेगावमधील मनपाच्या केंद्रावर जाऊन बीएलओंना अडवून दमदाटी केल्याचा प्रकार घडला. त्यानंतर तिथे कामकाज थांबवण्यात आले.

या घटनेची माहिती कळताच उपजिल्हाधिकारी नीलेश आपार यांनी घटनास्थळी धाव घेत गोंधळ घालणाऱ्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतू ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलीसांना पाचारण करावे लागले. आयोगाने आक्षेप नोंदवण्यासाठी २६ |ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पुर्वीच्या डेडलाईन नुसार शेवटच्या दिवशी पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपकडून १९ हजार आक्षेप दाखल करण्यात आल्यानंतर हा वाद सुरू झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT