Mla Suresh Dhas-Mla Balasaheb Ajbe News Sarkarnama
मराठवाडा

Mla Suresh Dhas News : `खुंटेफळ`, प्रकल्पावरून आजबे-धस मागे हटेना ; आरोपांच्या फैरी सुरूच..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. (Mla Suresh Dhas News) आजबे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमांतून केलेल्या आरोपांना धस यांनी जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे.

लाभार्थी नातेवाईकांची अर्धवट माहिती देऊन आमदार आजबे लोकांची दिशाभूल करत असल्याची टीका धस (Suresh Dhas) यांनी केली आहे. खुंटेफळ साठवण तलावातील संपादित जमिनीतील माझ्या चार नातेवाईकांची नावे आजबे यांनी सांगितली. परंतु त्यांचे क्षेत्र का सांगितले नाही ? असा प्रश्न देखील धस यांनी केला. (Balasaheb Ajbe) आजबे यांनी पत्रकार परिषदेत खुंटेफळ तलावातील माझ्या चार नातेवाईकांची नावे सांगितली.

परंतु त्यातील गणेश शिंदे, महेश शिंदे व नवनाथ शिंदे या तिघांच्या नावावर एक गुंठा म्हणजे एक हजार स्क्वेअर फूट सामाईक मालकीची जमीन आहे. (BJP) मोहन हौसराव झांबरे यांच्या नावावर अर्धा गुंठा म्हणजे ५०० स्क्वेअर फूट एवढेच क्षेत्र आहे. या क्षेत्राचा उल्लेख त्यांनी का केला नाही? कारण त्यांचा केवळ बदनामी करण्याचाच उद्देश होता. (NCP) सत्ताधारी पक्षात गेल्यानंतर तुम्ही आणि आपण मिळून खुंटेफळ तलावाचे काम करू असे म्हणावयास हवे होते. परंतु आपण बातम्या देऊन या श्रेयवादाला सुरुवात केली.

सीना मेहकरी प्रकल्पाचे काम देखील सन २००३ मध्ये तत्कालीन राज्यपाल मोहम्मद फजल हे आष्टीच्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी दौऱ्यावर असताना त्यांच्या समोर मी ही योजना मांडली होती. त्यामुळे माझ्याच काळात ९७ टक्के काम झाले होते. केवळ उद्घाटन नंतर करण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेचे देखील श्रेय अन्य कोणीही घेऊ शकत नाही, असे माझे स्पष्ट मत असल्याचे धस म्हणाले.

खुंटेफळ साठवण तलावात शासनाच्या धोरणानुसार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी जमिनीची खातेफोड केलेली आहे. या तलावातील मूळ खातेदार केवळ ४०० असून खातेफोड झाल्यामुळे ७०० झाले आहेत. कुंबेफळ येथील ३०० खातेदारांचे ६०० खातेदार झाले आहेत. कारण शासकीय धोरणानुसार त्यांना राहण्यासाठी प्लॉट आणि २०० स्क्वेअर फूट जमीन संपादित करण्यात आली तर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळू शकते. तसेच इतर फायदे मिळू शकतात. या आशेमुळे या गोरगरीब शेतकऱ्यांनी खातेफोड केलेली आहे.

हा तलाव होण्यापूर्वी माझ्या मामाचे नातेवाईक साहेबराव काकडे (गुरुजी) हे त्या क्षेत्रातील शेतकरी आहेत. त्यामुळेच केवळ मुलांना नोकरीसाठी आवश्यक असलेले धरणग्रस्त प्रमाणपत्रासाठी एका गुंठ्याची खरेदी झालेली आहे. तसेच मोकाशे आडनावाच्या व्यक्तीचा आपण उल्लेख केला. परंतु त्यांच्या पत्नीच्या नावे तिच्या नातेवाईकांकडून जमीन तिच्या नावावर झालेली आहे. तसेच काही शेतकऱ्यांना मूल्यांकनाची जादा रक्कम आणि काही शेतकऱ्यांना कमी असा आरोप आपण करत आहात.

वास्तविक, खुंटेफळ, कुंबेफळ, सोलापूरवाडी आणि बाळेवाडी या बुडीत क्षेत्रातील चार गावांतील क्षेत्राचे संयुक्त मोजणी प्रस्ताव ता. ५ मार्च २०२० रोजी सादर झाला आहे. उपाधीक्षक,भूमिअभिलेख यांनी ता. ३ नोव्हेंबर २०२० रोजी संयुक्त मोजणी अहवाल उपविभागीय अधिकारी यांना सादर केला आहे. तसेच इतर घटकांची मूल्यांकनांची सर्व प्रक्रिया महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात झालेली आहे. ही सर्व मूल्यांकने उपविभागीय अधिकारी पाटोदा यांच्याकडे सादर झाली.

त्यानंतर त्यांनी ६ मार्च २०२३ मध्ये निवाडा घोषित केला. आपण याबाबत या दोन वर्षात आक्षेप का घेतला नाही ? याचा दुसरा अर्थ असा की आपण या तलावाच्या बाबतीत काहीही अभ्यास न करत आरोप करत आहात, असा टोलाही धस यांनी आजबेंना लगावला. राम खाडे यांना आपणच देवस्थानच्या जमिनींबाबत तक्रारी करायला लावल्या आहेत, असा आरोप करत धस यांनी आजबेंनी त्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार, गृहमंत्री यांच्याकडे पाठविले. परंतु अगदी विशेष तपास यंत्रणा (एसआयटी) लावून देखील माझ्याविरुद्ध काहीही पुरावे सापडले नाहीत.अशा प्रकारच्या तुम्ही हजारो तक्रारी करा, त्यातून काहीही साध्य होणार नाही, असे जाहीर आव्हान धस यांनी दिले. दादेगाव येथील श्रीराम देवस्थानची ७०० एकर जमीन शिराळ गावातील नागरिकांकडे आहे.

त्यापैकी आपणाकडेही १५० ते २०० एकर जमीन असावी. ही जमीन आपण फुकट खात आहात. कारण १९९० सालापासून आतापर्यंत श्रीरामचंद्र देवस्थान दादेगाव यांना सर्व लाभधारकांनी मिळून एकूण केवळ २ लाख २५ हजार रुपये दिलेले आहेत. म्हणजे श्रीराम देवस्थानसंबंधी यांना किती आत्मीयता आहे हे दिसून येते. शिराळ येथील कोणत्याही लाभधारकाचे नाव सातबारावर नाही तरी देखील आपण इतरांवर आरोप करत दुसऱ्यांच्या घराचे वासे मोजत आहात. दहा वर्षांपूर्वीच्या खरेदीचा आपण आता उल्लेख करून राजकीय पोळी भाजत आहात. या सर्व आरोपातून आपण डोंगर पोखरून काय बाहेर काढले आहे याचे आत्मपरीक्षण करावे, असा चिमटाही धस यांनी आजबेंना काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT