Dhananjay Munde supporter controversy  Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde supporter controversy : "मुंडेंच्या केसाला धक्का लागला तर…!" जरांगे-धस यांचा ‘खेळ खल्लास’, समर्थकाच्या पोस्टनं राजकारणात खळबळ

Dhananjay Munde Supporter Govind Phad Facebook Post And Sparks Row : अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या समर्थकाने फेसबुकवर पोस्ट करत मनोज जरांगे आणि आमदार सुरेश धस यांना टार्गेट केल्यानं खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

Beed political news : संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील राजकीय गुन्हेगारी राज्यासह देशात चर्चेत असतानाच, तिथली कायदा-सु्व्यवस्थेचा प्रश्न सातत्याने कोणत्या-कोणत्याने कारणाने चर्चेत असतो.

आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ होईल, अशी समाज माध्यमांवर अजित पवार राष्ट्रवादीचे बीड परळीमधील माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या समर्थकाने फेसबुकवर पोस्ट केली आहे. या पोस्टने बीडसह राज्याचं राजकारण आगामी काळात ढवळून निघेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बीडमधील आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे कट्टर समर्थक गोविंद फड याने फेसबुकवर पोस्ट करत, धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला, तर मनोज जरांगे आणि सुरेश धस यांचा खेळ खल्लास, असे म्हटले आहे. हे भंडारा लावून बोलतोय, असेही या पोस्टमध्ये म्हटल्याने खळबळ उडाली आहे.

गोविंद फड हा व्यवसायाने वकील दिसतो. कारण, त्याच्या फेसबुकवरील नावासमोर Adv, असे लिहिले आहे. याशिवाय गोविंद फड यांचे धनंजय मुंडे यांच्याबरोबर असलेले फोटो देखील समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागले आहेत.

बीडमधील (Beed) राजकीय परिस्थिती सर्वश्रुत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनानंतर संपूर्ण राज्यात विशेष करून, मराठवाड्यात मराठा अन् ओबीसी समाजात संघर्ष आहे. गेल्या काही दिवसांत मनोज जरांगे पाटील यांनी काही मुद्यांवरून धनंजय मुंडेंना इशारा दिले होते.

मुंडेविरुद्ध धस राजकीय संघर्ष

सुरेश धस हे भाजपचे आमदार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येत सुरेश धस यांनी विधिमंडळात आवाज उठवला होता. त्यानंतर सभागृहाबाहेर देखील देशमुख हत्याप्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. यातून मुंडेविरुद्ध धस अन् सर्व, असा संघर्ष बीडच्या राजकारणात दिसतो आहे.

वाल्मिक कराडमुळे मुंडेंच्या राजकीय अडचणी

संतोष देशमुख हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि त्याची टोळी गजाआड आहे. वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे यांच्या राज्याच्या राजकारणात अडचणी वाढल्या आहेत. धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड याचे समर्थन करत नसले, तरी त्यांना मंत्रिपद गमवावे लागले आहे.

मुंडेंच्या राजकीय गणितांवर समर्थकांकडून पाणी...

बीडच्या परळी इथं पशुधन महा-एक्स्पो झाला. मंत्री पंकजा मुंडे यांच्याबरोबर व्यासपीठावर धनंजय मुंडे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत धनंजय मुंडे यांनी करत तिथं जोरदार भाषण करत, फडणवीस यांचा 'कामधेनू',असा उल्लेख करत मनातलं सर्व जाणता असे म्हटलं होतं. एकीकडे धनंजय मुंडे राजकीय गणित जुळवत असतानाच, त्यांचे समर्थक अशा पोस्टद्वारे त्यांच्याच अडचणी वाढवत असल्याची चर्चा आहे.

जरांगे अन् धस यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष...

धनंजय मुंडे यांचे समर्थक गोविंद फड याच्या या फेसबुक पोस्टवर मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार सुरेश धस काय प्रतिक्रिया देतात? याप्रकरणी गुन्ह्याची नोंद होते काय? पोलिसांकडून नेमकी काय कारवाई होईल? याकडे आता लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT