Dhananjay Munde : महाराष्ट्राचा दादा माणूस आज अनंतात विलिन होताना अत्यंत जड अंतःकरणाने आदरांजली अर्पण केली. दादा आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही. तुमच्याविना पोरके, अपुरे आणि अर्धवट आहोत. नियती इतकी क्रूर कशी असू शकते? तुमच्या धनंजयचा अखेरचा दंडवत दादा, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी आपल्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यात एक वेगळेच नाते निर्माण झाले होते. अजित पवार कायम धनंजय मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. प्रसंग कोणताही असो अजित पवारांनी त्यांना कधी अंतर दिले नाही. धनंजय मुंडे यांच्या राजकीय, वैयक्तिक जीवनात आलेल्या प्रत्येक संकटात त्यांना धीर, दिलासा देण्याचे काम अजित पवारांनी केले.
त्यामुळे अजित पवारांच्या अचानक जाण्याचा सर्वाधिक धक्का मुंडे यांना बसला. अजित पवार यांचे बारामतीतील विमान अपघातात निधन झाल्याचे कळाल्यापासून धनंजय मुंडे यांच्या डोळ्यातले अश्रू थांबले नाहीत. बारामतीकडे निघाल्यापासून ते आज अजित पवारांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेताना धनंजय मुंडे यांची तीच अवस्था होती.
माझे दादा मला पोरका करून गेले, माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला वडील नसल्याचे कधी जाणवू दिले नाही. माझं आणि दादांचं नातं शब्दात सांगू शकत नाही. संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी घेऊन झोपणार आणि भल्या पहाटे ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कामाला लागणारा नेता, वेळेचे नियोजन, शिस्त यातून विकासाचा दरारा महाराष्ट्रात उभा करणारे दादा आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला स्तब्ध करून आणि आम्हा सर्वांना दुःखाच्या छायेत सोडून निघून गेल्याच्या भावना धनंजय मुंडे यांनी काल व्यक्त केल्या होत्या.
दादांचे अकाली निधन ही घटनाच मुळात हृदयाला न पटणारी आहे. आमचे राजकीय अस्तित्व दादांच्या जीवावर होते. त्यामुळे अजूनही असं वाटतंय की आत्ता दादांचा फोन येईल आणि म्हणतील, धनंजय वेळेवर ये बरका... त्यामुळे श्रद्धांजली हा शब्दच फुटत नाहीये. देशाची, राज्याची, पक्षाची, माझ्या बीड जिल्ह्याची आणि माझी कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी शोक व्यक्त केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.