Suresh Dhas Ajit Pawar sarkarnama
मराठवाडा

Beed Politics : बीड दौऱ्यावर येताच अजितदादांचा मोठा निर्णय, मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या सुरेश धसांसह 'या' आमदाराला डीपीडीसीतून हटवलं

District Planning Committee Beed : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये येताच त्यांनी विविध कामांचा आढावा घेत राजकीय नियोजनाला सुरुवात केली असून ते बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी हजर राहणार आहेत.

Jagdish Patil

Beed News, 30 Jan : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे गुरूवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. बीडमध्ये येताच त्यांनी विविध कामांचा आढावा घेत राजकीय नियोजनाला सुरुवात केली. ते आज बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी हजर राहणार आहेत.

मात्र या बैठकीआधी नियोजन सदस्य समितीमधून भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांना वगळल्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या बीड (Beed) जिल्हा देशभरात चर्चेत आहे. या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे हितसंबंध असल्याचा आरोप करत सुरेश धस आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके सातत्याने करत आहेत.

शिवाय धस आणि सोळंके यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे. धस यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी (Ajit Pawar) ते त्यांच्या पक्षातील खालचे नेते असून मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलेने असं म्हणत धसांवर प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. अशातच आता आज बीड जिल्ह्याच्या नियोजन सदस्य समितीमधून धस यांचा पत्ता कट झाल्याने या दोन्ही आमदारांना अजितदादांनी मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे.

नेमंक प्रकरण काय?

बीड जिल्हा नियोजन समितीच्या विधीमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या दोन सदस्यांमधून राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार विजयसिंह पंडित तर भाजपच्या कोट्यातून आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर या समितीमधून आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि प्रकाश सोळंके यांना वगळण्यात आलं आहे.

महायुतीची सत्ता येताच राज्यातील सर्व नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्या रद्द केल्यामुळे या समित्यांवर केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारीच राहिले होते. अशातच बीड जिल्हा नियोजन समितीवर विधीमंडळ सदस्यांमधून दोन जागांवर आमदार विजयसिंह पंडित आणि नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील निर्णयामुळे जुन्या विधानमंडळ सदस्य असलेल्या आमदारांना धक्का दिल्याचं बोललं जात आहे.

अजितदादांचा पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना दम

दरम्यान, बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर अजित पवार आज पहिल्यांदाच बीडमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांनी अजितदादांचं स्वागत केलं. तर यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. अजितदादा म्हणाले, आपल्या हातात पाच वर्ष आहेत. आपल्याला चांगल्याप्रकारे कामं करायची आहेत. बीडबाबतच्या (Beed) वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आपण वाचत असतो. यामध्ये जिथे तथ्य असेल तिथे संबंधितांवर कारवाई केली जाईल.

पण जिथे तथ्य नसेल त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. मी अनेक ठिकाणी पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. बीडमध्ये कष्टकरी समाज मोठ्या प्रमाणात राहतो. मी काम करताना कधीही जातीपातीचा विचार करत नाही. त्यामुळे जातीय सलोखा आपण ठेवला पाहिजे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. मात्र, जर कोणी एखाद्या गोष्टीसाठी जबाबदार असेल, विकास कामे करताना कोणी कोणाला खंडणी मागितली असेल तर मी मकोका लावायला देखील मागे पुढे बघणार नाही.", असा सज्जड दमच अजित पवारांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT