Mla Amar Rajurkar-Abdul Sattar News, Nanded Sarkarnama
मराठवाडा

Amar Rajurkar : तेव्हा सत्तार बरे होते, तिकडे जाऊन बिघडले ; खोटंही बोलायला लागले..

चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली देखील सत्तार यांनी काम आणि मंत्रीमंडळात मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांच्या बाबतीत सत्तार यांनी केलेला दावा हास्यास्पदच म्हणावा लागेल. (Nanded News)

सरकारनामा ब्युरो

नांदेड : सध्या राज्याचे कृषीमंत्री असलेले अब्दुल सत्तार खरतर माझे चांगले मित्र आहेत. अशोक चव्हाण साहेबांशी देखील त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात सत्तार मंत्री देखील होते. पण आमच्याकडे होते तेव्हा ते बरे होते, भाजप आणि शिंदेगटात जाऊन ते पुरते बिघडले आहेत. त्यांना देखील खोटं बोलायची सवय लागल्याचा टोला काॅंग्रेसचे आमदार अमर राजूरकर यांनी सत्तार यांना लगावला.

काल औरंगाबादेत पत्रकारांशी बोलतांना अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी अमर राजूकर यांचा हवाला देत अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला होता. या संदर्भात नांदेडमध्ये भारत जोडो यात्रेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेनंतर राजूकर यांना या संदर्भात विचारले असता त्यांनी सत्तार यांची खिल्ली उडवली.

औरंगाबाद : काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत. सर्वप्रथम नांदेडचे खासदार आणि चव्हाण यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांनी या संदर्भातील विधान केले होते. यावर `चर्चा कोण करतयं`, अशा मोजक्या शब्दात चिखलीकरांचा दावा खोडून काढला होता.

राज्याचे कृषीमंत्री आणि कधीकाळी अशोक चव्हाण यांचे विश्वासू राहिलेले अब्दुल सत्तार यांनीच चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची कुजबूज सुरू असून ही माहिती आपल्याला त्यांच्याच जवळच्या आमदाराने सांगितल्याचा दावा केला. सत्तार यांनी थेट आमदार अमर राजूकर यांचे नाव घेत चव्हाणांच्या भाजप प्रवेशाचा दावा केल्याने पुन्हा एकदा चर्चा झडू लागली आहे.

यावर राजूरकर यांनी मात्र सत्तार यांचा शालजोडीतून समाचार घेतला. राजूरकर म्हणाले, अब्दुल सत्तार यांची आणि माझी वैयक्तिक मैत्री आहे. आम्ही अनेक वर्ष काॅंग्रेसमध्ये एकत्र काम केले आहे. अशोक चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली देखील सत्तार यांनी काम आणि मंत्रीमंडळात मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे.

त्यामुळे अशोक चव्हाणांच्या बाबतीत सत्तार यांनी केलेला दावा हास्यास्पदच म्हणावा लागेल. काॅंग्रेसमध्ये होते तेव्हा सत्तार बरे होते, पण भाजप, शिंदे गटासोबत जाऊन त्यांनाही खोटं बोलायची सवय लागली असे दिसते. ते तिकडे जाऊन बिघडले एवढेच मला म्हणावेसे वाटते, अशा शब्दात राजूरकर यांनी सत्तारांचा दावा फेटाळून लावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT