Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve : नियम धाब्यावर बसवून महसूल विभागात बदल्या; अंबादास दानवेंच्या आरोपाने खळबळ

Revenue Officers Transfer : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महसूल विभागात नियमांचे उल्लंघन करून बदल्या करण्यात येत आहेत.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच महसूल विभागात सरार्सपणे नियम धाब्यावर बसून मोठ्या प्रमाणात बदल्यांचे सत्र सुरू आहे, असा गंभीर आरोप विधानस परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दानवेंच्या या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियम आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 च्या कलम 3 (1) नुसार कोणत्याही अधिकाऱ्याचा एका पदावरील कालावधी 3 वर्षांचा असेल. तसेच एका कार्यालयातून किंवा एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली ही त्यांचे 6 वर्षे पूर्ण झाल्यावर करता येईल, अशी तरतूद आहे.

या अधिनियमाच्या कलम 4 मध्ये 3 वर्षाचा कालावधी पूर्ण केल्याशिवाय बदली करता येणार नाही. कलम 4 (4) मध्ये अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या वर्षातून एकदाच केवळ एप्रिल आणि मे महिन्यात करण्यात येतील, अशी तरतूद आहे.

वर्षातील कोणत्याही वेळी बदली करणे आवश्यक असल्यास सक्षम प्राधिकारी यांची खात्री पटल्यास आणि लेखी कारणे नमूद करून करता येईल अशी तरतूद आहे. मात्र, महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची कोणत्याही कायद्याचे, नियमांचे, सूचनांचे पालन न करताच नियमबाह्य बदल्या झाल्या आहेत. या बदल्यांचे सत्र अजूनही सुरू असल्याचे दानवे यांचे म्हणणे आहे.

भारत निवडणूक आयोगाने Election Commission 31 जुलै 2024 अन्वये जे अधिकारी थेट निवडणूक कामांशी संबंधित आहेत आणि ज्यांना 31 डिसेंबर 2024 रोजी मागील 4 वर्षात 3 वर्ष पूर्ण होत आहेत, अशाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच बदली करण्यापूर्वी निवडणूक आयोगाची पूर्व मान्यता घेऊनच बदली करण्याबाबत बजावले आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या निकषात न बसणाऱ्या अधिकाऱ्यांच्याही सर्रास बदल्या करण्यात आल्या असल्याचा दावा दानवेंनी केला.

ज्या अधिकाऱ्यांचा स्वजिल्हा नाही आणि मागील 4 वर्षात 3 वर्ष पूर्ण झाले नाही, अशा काही अधिकाऱ्यांच्या त्यांच्या सोईच्या पदावर बदल्या झाल्या आहेत. तर काही अधिकाऱ्यांच्या गैरसोयीच्या पदावर बदल्या करण्यात आल्याकडेही दानवेंनी Ambadas Danve लक्ष वेधले.

येणारी विधानसभा निवडणूक समोर ठेवून आणि निवडणुकीच्या प्रक्रियेत त्यांना मदत होईल, असा दृष्टीकोन ठेवून काही लोकप्रतिधींनी त्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांची त्यांच्या मतदारसंघात बदल्या करून घेतल्या असल्याचा थेट आरोप दानवेंनी केल्याने राज्यात चर्चेचा विषय बनला आहे.

कायद्याचे, नियमांचे कोणतेही पालन न करता, सूचनांचे उल्लंघन करून अत्यंत घाईत आणि फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार करून बदल्या करण्यात येत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची उच्च स्तरीय समिती मार्फत चौकशी करून बेकायदेशीर करण्यात आलेल्या बदल्या रद्द करण्याची मागणी दानवेंनी केली आहे.

या प्रक्रियेत समावेश असलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध म.ना.से (शिस्त व अपील) 1979 अन्वये व निवडणूक प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्यामुळे निवडणूक नियमांच्या अंतर्गत कडक कारवाई करण्याची मागणीही दानवे यांनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री व निवडणूक आयोग यांच्याकडे पत्राद्वारे केलेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT