New Delhi : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी गुरूवारी बीड व पुण्यासाठी लोकसभेत आवाज उठवला. यावेळी त्यांच्याशेजारी पक्षाच्या गटनेत्या सुप्रिया सुळे बसल्या होत्या. सोनवणे यांचे भाषण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यासह काही खासदारांनी बाके वाजवून आणि ‘व्हेरी गुड’ त्यांचे कौतुक केले.
बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्यात विमानतळ करण्याची मागणी लोकसभेत केली. बीड मतदारसंघापासून 130 किलोमीटरवर संभाजीनगर आहे. दुसऱ्या बाजूला लातूर आहे. तिथेही नियमित सुविधा नाही. तर पुणे 500 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे बीडमध्ये नवीन विमानतळ उभारण्याची आवश्यकता आहे, असे सोनवणे म्हणाले.
आम्हाला अनेकांना दिल्लीला यायचे असेल तरी मुंबई किंवा पुण्याला यावे लागते. बीडमध्ये विमानतळ झाल्यास त्याचा बीडसह लातूर आणि धाराशीवलाही फायदा होईल. शेतकऱ्यांनाही या सुविधेचा फायदा होईल, असे सोनवणे यांनी सांगितले. पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुद्दाही सोनवणे यांनी उपस्थित केला.
पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार, हे ऐकून ऐकून कंटाळा आले. ते विमानतळ कधी होणार, असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रात सर्वात सुंदर शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावे. तसेच झाले तर महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल, असे सोवणे यांनी सांगितले.
देशातील विमानसेवा विस्कळीत झाली आहे. प्रवाशांना मोठा त्रास होत आहे. दोन ते चार तास विलंब होत आहे. परवा आम्हाला दिल्लीत उतरण्यासाठी तीन तास वर फिरावे लागले. प्रवाशांचा हा त्रास कमी करायला हवा. त्यासाठी सरकारने संबंधित कंपन्यांना सूचना द्यायला हव्यात, अशी आग्रही मागणी सोनवणेही यांनी यावेळी केली.
जगात आपली अर्थव्यवस्था वाढविण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. जगात केवळ बोईंग आणि एअरबेस या दोनच कंपन्या विमान बनवितात. आपल्याला देश आत्मनिर्भर बनवायचा आहे, तर मग आपल्या देशात विमाने बनवायला हवीत. आपल्या देशाने त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे सोनवणे म्हणाले.
सोनवणे यांनी आपले भाषण पूर्ण केल्यानंतर शेजारी बसलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह मागील बाकांवर बसलेल्या सदस्यांनी बाके वाजवून व्हेरी गुड म्हणून सोनवणे यांच्या भाषणाचे कौतुक केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.