Sanjay Shirsat On Khaire-Danve News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat On Khaire-Danve : खैरे-दानवे वादाच्या आगीत संजय शिरसाटांनी ओतले तेल!

In a recent political debate, Minister Sanjay Shirsat criticized Ambadas Danve's administration, calling it ineffective. The dispute between Danve and Khaire has escalated, with Shirsat joining the fray. : खैरे यांचे मराठवाड्यात शिवसेना वाढवण्यात मोठे योगदान असल्याचे शिरसाट यांनी मान्य केले. तर अंबादास दानवे यांचा कारभार शून्य असल्याची टीका केली.

Jagdish Pansare

Shivsena News : जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेतील दोन नेत्यांमधील वाद नवा नाही. अगदी शिवसेनेत फूट पडण्याच्या आधीपासून चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे असे दोन गट होते. राजू शिंदे या भाजपातून आयात केलेल्या राजू शिंदे यांनी नुकताच पक्षाला जय महाराष्ट्र केला. पण जाताजाता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याबद्दलची नाराजी आणि त्यामुळे पक्ष सोडत असल्याचे सांगून वादाला तोंड फोडले.

आता याच खैरे-दानवे यांच्या वादाच्या आगीत शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी तेल ओतण्याचे काम केले आहे. चंद्रकांत खैरेंनी शिवसेना वाढवण्यासाठी कष्ट घेतले हे नाकारून चालणार नाही. तर अंबादास दानवे यांच्या शून्य कारभारामुळे जिल्ह्यात उबाठा शिवसेनेचा एकही आमदार, खासदार निवडून येऊ शकला नाही, असा थेट आरोप शिरसाट यांनी केला. अंबादास दानवे यांना जो विरोधी पक्षनेते पदाचा अचानक धनलाभ झाला आहे, त्याची घमेंड त्यांना आली आहे, अशी टीकाही शिरसाट यांनी केली.

राजू शिंदे यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला, आता त्यांचा भाजपा प्रवेश कधी निश्चित होतो याकडे त्यांच्या समर्थक आणि विरोधकांचेही लक्ष लागले आहे. मात्र पक्ष सोडताना शिंदे यांनी चंद्रकांत खैरे यांना व्हिलन ठरवण्याचे काम चोख पार पाडले. (Ambadas Danve) अंबादास दानवे यांचे कौतुक आणि खैरे यांच्याबद्दल नाराजी आणि गंभीर आरोप करत राजू शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आणली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खैरे-शिंदे यांनी एकमेकांवर जे आरोप केले, त्याबद्दल भ्र शब्दही काढला नाही. उलट खैरे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचे मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते, असे सांगत खैरेंचा डाव त्यांच्यावरच उलटवण्याचा प्रयत्न केला. लोकसभा आणि राज्यसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी मतदान केले. त्यानंतर अचानक काल अंबादास दानवे यांनी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट होती, असे दानवे यांनी स्पष्ट केले. पण त्यांच्या या भेटीने जिल्ह्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होऊ पाहत आहे. संजय शिरसाट यांनी काल सविस्तर पत्रकार परिषद घेत राज्य आणि देश पातळीवरील घटना, घडामोडींवर भाष्य केले. खैरे-दानवे वादावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले. खैरे यांचे मराठवाड्यात शिवसेना वाढवण्यात मोठे योगदान असल्याचे शिरसाट यांनी मान्य केले. तर अंबादास दानवे यांचा कारभार शून्य असल्याची टीका केली.

शिरसाट-खैरे-दानवे हे कित्येक वर्ष एकाच पक्षात होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर खैरे-शिरसाट, शिरसाट-दानवे यांच्या अनेकदा वाद, टीका, आरोप-प्रत्यारोप झाले. पण शिरसाट यांनी खैरे यांच्याबाबतीत थोडी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून आले. एवढेच नाही, तर 2024 लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून लढण्याची आॅफरही दिली होती. मात्र खैरे यांनी ती नाकारत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला.

अंबादास दानवे आणि संजय शिरसाट यांच्यात मात्र गेल्या दोन-अडीच वर्षात अनेकदा टोकाचे वाद झाले. दोघांनी एकमेकांची उणीदुणी काढली. राजू शिंदे यांना शिवसेनेते प्रवेश देऊन शिरसाट यांच्याविरोधात मैदानात उतरवण्यात अंबादास दानवे यांचाच हात होता. त्यामुळे शिंदे यांनी पक्ष सोडल्यानंतर सुरु झालेल्या खैरे- दानवे वादात शिरसाट यांनी खैरेंची बाजू घेत अंबादास दानवे यांच्यावर अपयशाचे खापर फोडले. अंबादास दानवे यांनी अद्याप यावर भाष्य केले नसले तरी ते शिरसाट यांना प्रत्युत्तर देण्याची दाट शक्यता आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT