Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : 'बाप बडा ना भैय्या..' भाजपला फटकारत; अंबादास दानवेंनी केला पराभव मान्य!

Ambadas Danve statement on BJP : शिवसेना नेते अंबादास दानवेंनी भाजपवर जोरदार टीका करत पराभव मान्य केला. त्यांची प्रतिक्रिया आणि राजकीय अर्थ जाणून घ्या.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : छत्रपती संभाजीनगर शहराचा वर्षातल्या 365 पैकी फक्त 44 दिवस पाणी येते. भाजपने या शहराला एक हजार कोटी रुपयांच्या कर्जाच्या खाईत लोटले, सगळी कंत्राटं गुजरातच्या एजन्सीला दिली जात आहेत. तरीही संभाजीनगरच्या जनतेला भाजपला निवडून द्यावे असे वाटले असले तर काही हरकत नाही.

कदाचित जनतेला दररोज पाणी नको असेल, अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली. 'बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या'असे म्हणत भाजपकडून निवडणुकीत करण्यात आलेल्या पैशाच्या अतिवृष्टीमुळे आमचा पराभव झाला. पण आम्हाला तो मान्य असल्याचे अंबादास दानवे म्हणाले.

महापालिका निवडणुकीत स्वबळावर 98 जागा लढवणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला फक्त सहा जागा जिंकता आल्या. उद्धव ठाकरे यांनी महापालिकेची संपूर्ण जबाबदारी ही दानवे यांच्या खांद्यावर दिली होती. उमेदवारांच्या मुलाखती घेण्यापासून ते तिकीट वाटप आणि प्रचाराचे सगळे नियोजन दानवे यांनीच पाहिले. उद्धव ठाकरे यांच्या सभेला उत्सफूर्त प्रतिसाद मिळूनही शिवसेनेला महापालिका निवडणुकीत दोन आकडी जागा जिंकता आल्या नाही. खैरे-दानवे यांच्यातील अंतर्गत वादाचा फटकाही या पक्षाला बसल्याचे बोलले जाते.

दरम्यान, पराभव मान्य करत अंबादास दानवे यांनी जनतेचा कौल मानावाच लागेल असे म्हटले आहे. पराभव मान्य असला तरी आमचे पस्तीस उमेदवार हे दुसऱ्या नंबरवर होते. आम्ही प्रचारही जोरात केला, घरोघरी मतदारांपर्यंत पोहचलो, उद्धव ठाकरेंची सभाही विराट झाली. पण शेवटच्या दिवशी पैशाची जी धो धो अतिवृष्टी झाली त्यात आमचेच नाही तर, शिंदेंची शिवसेना, काँग्रेस, वंचित आघाडीही धुवून निघाली, अशी कबुली दानवे यांनी दिली.

भाजपने मतदानासाठी पाच ते बारा हजार रुपये वाटले. निवडणूक आयोग झोपलेला होता, त्यामुळे पैसे वाटणाऱ्यांना पकडण्याचा विषयच नाही. काही ठिकाणी ईव्हीएममध्ये गडबडी झाल्याच्या तक्रारी पण आल्या. भाजपने पाणी दिले नाही, शहराला एक हजार कोटीच्या कर्जाच्या खाईत टाकले तरी जनतेने भाजपला निवडून दिले. वर्षातील 44 दिवसच पाणी मिळाले, सगळ्या एजन्सी गुजरातच्या तरी जनतेने जर असा विचार केला असले तर त्यांना शुभेच्छा, असा टोलाही दानवे यांनी लगावला.

पराभव झाला असला तरी आम्ही जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही. सत्तेपुढे शहाणपण टिकत नाही हे नाकारून चालणार नाही. भाजपला शिवसेना संपवायची होती, त्यांचा डाव यशस्वी होताना दिसतो आहे. आमचं आणि शिंदेंच्या शिवसेनेचेही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. त्यांच्याकडे सत्ता, संपती, मंत्री पद असून ते 12 जागा जिंकले. आम्ही काही नसताना सहा जागा जिंकल्या. भाजपला शिवसेना संपवायची आहे, असा आरोप करतानाच मुंबईत पक्ष फुटल्यानंतरही सत्तर जागा उद्धव ठाकरे यांनी जिंकल्या हे कमी नाही. यापुढेही महाराष्ट्राची सेवा करतच राहू, असे दानवे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT