Shivsena UBT : पावसाळी अधिवेशन काळात विधान भवन परिसरातच झालेली हाणामारी, आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचार्याला केलेली बेदम मारहाण, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे विधिमंडळाच्या सभागृहातच रमी खेळणे यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झालेले आहेत. काही मंत्र्यांना डच्चू मिळणार असे वाटत असताना काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी केवळ संबधित मंत्र्यांना समज, ताकीद देऊन वेळ मारून नेली.
यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. राज्याचे कारभारी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची शिस्त तशी नावालाच उरली आहे असे वाटते. घपले करून हॉटेल घ्या, विधिमंडळात रम्मी खेळा, बरळा, मारामारी करा, कोणाच्याही नाकावर बुक्का मारा.. काहीही करा! आता हे दोन शिस्तीचे लोक फक्त नाराजी.. तीव्र नाराजी.. अति तीव्र नाराजी व्यक्त करतानाच दिसतात, असा टोला दानवे यांनी लगावला.
छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना अंबादास दानवे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना राजीनामा द्यावा लागेल. चौकशी झाली असून या चौकशीत माणिकराव कोकाटे अर्धा तास रम्मी खेळत होते, हे स्पष्ट झाले आहे. हा अहवाल बाहेर आला नाही पण आम्ही माहिती घेतली आहे.
शेतकर्यांची परिस्थिती बघता कृषी मंत्री संवेदनशील नाही असे दिसते. कोकाटे यांनी राजीनामा दिला पाहिजे अथवा तो घेतला पाहिजे. मोबाईल वर खेळण्यापेक्षा पत्त्यांचा कॅट घेऊन त्यांनी सभागृहात जायला हवे होते, असा चिमटाही अंबादास दानवे यांनी काढला. प्रत्येकाला वैयक्तिक आयुष्य असते त्यामुळे त्याच्या बाबतीत घडलेले खासगी विषय हे खासगीच राहिले पाहिजेत.
मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करत बाहेरचा रस्ता दाखवण्याऐवजी राज्याचे कारभारी फक्त नाराजी व्यक्त करतात. नाराजी दाखवून काहीही होत नाही, मुख्यमंत्री सक्षम दिसत नाही, असेही दानवे म्हणाले. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत काँग्रेसचे लोकं भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. पक्ष नेतृत्वाची अवस्था दयनीय झाली आहे. भाजपातील लोकच या प्रवेशांमुळे नाराज आहेत, खासगीत ते आपली नाराजी बोलून दाखवतात.
भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर हनी ट्रॅपचा आरोप होत आहे. ते खोटे असतील तर महाजन यांनी सीता मातेसारखी परीक्षा द्यावी, असे दानवे म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कधी होणार? यावर आधी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आधी होतील, त्यानंतर नगर परिषद आणि महानगरपालिका असेही दानवे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.