Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : 'पुढच्या आषाढीला उद्धव ठाकरे पांडुरंगाची पूजा करतील, अन् आम्ही..' ; अंबादास दानवेंचं विधान चर्चेत!

Jagdish Pansare

Ambadas Danve On Aashadhi Ekadashi Puja : पुढच्या वर्षी आषाढी एकादशीला पंढरपुरात पांडुरंगाची पूजा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे करतील. आम्ही सगळे त्यांच्यासोबत असूत, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. आषाढी एकदशी निमित्त छोटे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळूज-पंढरपूर येथील मंदिरात पायी जात अंबादास दानवे यांनी दर्शन घेतले.

शेतकऱ्यांच्या जीवनात सुख आणि समृद्धी नांदावी यासाठी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडू दे. तसेच राज्याची आर्थिक उन्नती होऊ दे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार स्थापन होऊ दे. असे साकडे आपण पांडुरंगाच्या चरणी घातल्याचे अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी म्हटले आहे.

मंत्रीमंडळ विस्तार होणार म्हणून जॅकेट शिवून बसलेल्यांनी आता ते कुणाला तरी देऊन टाकावे, कारण मंत्रीमंडळ विस्तार होणारच नाही, असा टोला दानवे यांनी माध्यमांशी बोलताना लगावला. छोट्या पंढरपूरात पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेप्रमाणेच राज्यातील लाडक्या भावांसाठी योजना आणणार असल्याची घोषणा केली.

ती घोषणा फसवी असून राज्यातील सुशिक्षित रोजगार तरुणांना राज्याच्या कौशल्य विकास विभागाकडून अशा प्रकारचे काम आणि प्रशिक्षण काळात मानधन दिले जाते, यात नवे काहीच नाही. मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर येवून ही योजना काय आहे? ते लोकांना समजावून सांगावे, असे आव्हान अंबादास दानवे यांनी दिले.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल त्यांना विचारले असता भाजप(BJP) आणि महायुतीतील घटक पक्षांनी आपल्या आमदारांना दाखवलेले हे गाजर असल्याची खिल्ली दानवे यांनी उडवली. महायुतीमध्ये मंत्री होण्यासाठी लागलेली स्पर्धा पाहता मंत्रीमंडळ विस्तार झाला तर एक खूष आणि दहा आमदार नाराज होतील, अशी परिस्थिती आहे.

त्यामुळे कोणताही मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही. ज्यांनी मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी जॅकेट शिवून घेतले आहेत, त्यांनी ते आता कोणाला तरी देवून टाकावेत, असा चिमटा दानवे यांनी काढला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT